नाशिकमध्ये पावणेदोन हजार कोटींची गुंतवणूक
By admin | Published: June 1, 2017 03:02 AM2017-06-01T03:02:48+5:302017-06-01T03:02:48+5:30
‘मेक इन नाशिक’ प्रदर्शनातील दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात २८ उद्योग समूहांनी १ हजार ८७५ कोटी रुपयांची गुंतवणूक
गोकुळ सोनवणे/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मेक इन नाशिक’ प्रदर्शनातील दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात २८ उद्योग समूहांनी १ हजार ८७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून, तसे लेखी पत्र निमाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यातील २४ उद्योग समूह नाशिक जिल्ह्यातील, दोन मुंबईतील तर एक इंग्लंडमधील आहे.
सर्व उद्योगांचा प्रस्ताव विचारात घेता त्यासाठी जवळपास एक हजार एकर जागा लागणार आहे. नेहरू सेंटरमध्ये दोन दिवस हे प्रदर्शन भरले होते. राज्य सरकारने यापूर्वी मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया प्रकल्पात महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये गुंतवणुकीत स्वारस्य असल्याचे काही कंपन्यांनी सांगितले होते. त्यांचे प्रस्ताव उद्योग विभागाने ‘निमा’ला (नाशिक उद्योजक संघटना) पाठविले होते. त्याआधारे ‘निमा’ने पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा संबंधित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. मुंबईतील नोबेल हाईजिन, डेल्टा स्पीन टेस्ट व श्रीवेदा सत्व श्रीश्री रविशंकर ही बाहेरील कंपनी आहे. युरोपिअन मेटल सेंट्रल ही कंपनी लंडन येथील आहे. या कंपनीने २७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव एमआयडीसीकडे अगोदरच सादर केला होता. त्याचीही एक प्रत एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी ‘निमा’ला सादर केली.