आम्हाला संमेलनात सन्मानाने निमंत्रित करा - रवींद्र शोभणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:22 AM2017-12-11T04:22:35+5:302017-12-11T04:22:57+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत पराजित झालेल्या उमेदवारांना संंमेलनात सहभागी करून घेतले जात नसल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे, अशी खंत पराभूत उमेदवार रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत पराजित झालेल्या उमेदवारांना संंमेलनात सहभागी करून घेतले जात नसल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे, अशी खंत पराभूत उमेदवार रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली. तसेच आम्हाला वाळीत टाकू नये, सन्मानाने संमेलनात बोलवावे, सहभागी करून घ्यावे, अशी विनंती आयोजक संस्थेला केली आहे.
बडोदे येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत देशमुख यांनी शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला.
तसेच राजन खान, रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, किशोर सानप हे उमेदवारही पराभूत झाले. पराभूत उमेदवारांशी ‘लोकमत’ प्रतिनीधीने संवाद साधला.
पराभवाने मी काहीही गमावले नाही. उलट अंतर्मुख होऊन विचार करण्याचे आत्मबळ मी कमावले आहे. मला अंतर्बाह्य माणसं कळली. माणसं कळणं आणि वळणं हेच प्रतिभावंताचं धन आहे. तेच मी व्रतस्थपणे माझ्या लेखनातून मांडणार आहे.
- किशोर सानप,
साहित्यिक
महाराष्ट्रासह सगळीकडूनच मते कमी कशी पडली, याचेच आश्चर्य वाटत आहे. एकगठ्ठा मतदान होणे, मतपत्रिका गोळा करणे हे प्रकार नेहमीच घडताना दिसतात. या गोष्टी आता हळूहळू पुढे येऊ लागल्या आहेत. भविष्यात याला नक्कीच आळा बसेल.
- रवींद्र गुर्जर, साहित्यिक
ठराविक लोकांकडील एकगठ्ठा मतदान जिंकते. यंदाही तेच सिद्ध झाले. पण यापुढे साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी प्रयत्न करणार असून, सर्व आजीव सभासदांना मतदानाचा हक्क मिळायला हवा.
- राजन खान