विविध राष्ट्रप्रमुखांना निमंत्रणे
By admin | Published: October 4, 2016 01:48 AM2016-10-04T01:48:21+5:302016-10-04T01:48:21+5:30
भाषा, प्रांत, देश याचे ‘सीमोल्लंघन’ करून सातासमुद्रापार असलेल्या तेरा देशांंमधील पंजाबी बांधवांना आर्त साद घालत, पुण्यात होणाऱ्या विश्व पंजाबी साहित्य
पुणे : भाषा, प्रांत, देश याचे ‘सीमोल्लंघन’ करून सातासमुद्रापार असलेल्या तेरा देशांंमधील पंजाबी बांधवांना आर्त साद घालत, पुण्यात होणाऱ्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पंजाबी-मराठी मनोमिलनाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्या-त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह राजदूतांनाही पत्रे पाठविण्यात आली असून, अमेरिका, ब्रिटन, अफगाणिस्तान आदी विविध देशांच्या प्रतिनिधींनीही येण्याचे मान्य केले आहे.
घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये एक सांस्कृतिक बंध निर्माण झाला. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्याने या साहित्य समृद्धतेने नटलेल्या भूमीमध्ये पंजाबी अभिजनांच्या मांदियाळीत विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचा सोहळा रंगणार आहे. सरहद संस्थेतर्फे गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान हे संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या कक्षा रुंदावत संंमेलनाला वैश्विक रूप देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून सरहदचे संजय नहार म्हणाले, की या संमेलनाला केवळ देशभरातीलच नव्हे, तर पाकिस्तान सोडून १३ देशांमधील पंजाबी बांधवांना संमेलनाला येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय त्या-त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह राजदूतांनाही पत्रे पाठविण्यात आली आहेत. राष्ट्रप्रमुखांनी संमेलनासाठी संदेश पाठवावा आणि राजदूतांनी संमेलनास यावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संमेलनासाठी कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, अफगाणिस्तान, इराण आदी देशांंमधील प्रतिनिधींंनी येण्याचे मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.