आंदोलनातील अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक, अटक ५२ जणांमध्ये १६ अल्पवयीन आंदोलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:55 AM2018-01-05T05:55:33+5:302018-01-05T05:56:06+5:30
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे बुधवारी मुंबई ठप्प झाली. दुसरीकडे आंदोलनात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळेच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
मुंबई - कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे बुधवारी मुंबई ठप्प झाली. दुसरीकडे आंदोलनात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळेच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. मुंबईतल्या विविध भागांत दोन दिवसांत २५ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ४०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. ५२ जणांमध्ये १६ अल्पवयीन आंदोलक आहेत. हिंसक आंदोलनात मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया पोलिसांसह सर्वच स्तरांतून उमटत आहे.
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ मंगळवारपासूनच दुकाने बंद करण्यात आली. बुधवारी बंदच्या दिवशी घाटकोपर, रमाबाईनगर येथून या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि क्षणार्धात या आंदोलनाचे लोण मुंबईभर पसरले. मंगळवारी मुंबई पोलिसांनी ९ गुन्हे दाखल करून १०० जणांना ताब्यात घेतले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत १६ गुन्हे दाखल करून ३०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसांत ताब्यात घेतलेल्या
४०० जणांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
विचार करायला लावणारी बाब
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा व भादंवि कायद्यान्वये दोन दिवसांत
२५ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस प्रवक्ते सचिन पाटील यांनी दिली. हिंसाचारात अल्पवयीन मुलांचा पुढाकार ही विचार करायला लावणारी बाब असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
...म्हणूनच केला मुलांचा वापर
लहान मुले दगड फेकून सहज पसार होऊ शकतात. म्हणूनच आंदोलनात मुलांचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.