आयपीएलचे पाच सामने होणार ‘शिफ्ट’
By admin | Published: April 12, 2016 05:01 AM2016-04-12T05:01:01+5:302016-04-12T05:01:01+5:30
राज्यात जलसंकट असल्याने इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील एकूण ५ सामने राज्याबाहेर स्थानांतरित होऊ शकतात, असे संकेत आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सोमवारी दिले.
राजीव शुक्लांचे संकेत : जलसंकटामुळे नागपूर, पुण्यातील सामन्यांवर ‘तलवार’
नागपूर : राज्यात जलसंकट असल्याने इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील एकूण ५ सामने राज्याबाहेर स्थानांतरित होऊ शकतात, असे संकेत आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सोमवारी दिले. यात नागपुरात व्हीसीएच्या जामठा स्टेडियममधील ३ आणि पुण्यात होणाऱ्या २ प्लेआॅफ सामन्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या असल्याने आयपीएल सामन्यांना परवानगी देऊ नये, यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी सुरू आहे, हे विशेष. न्यायालयाने बीसीसीआयची कानउघाडणी करीत मुंबई, पुणे आणि नागपुरात होणारे सामने राज्याबाहेर हलविण्यास सांगितले होते. राजीव शुक्ला यांनी या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी नागपुरात आज सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. लोकमतशी बोलताना शुक्ला म्हणाले, ‘‘राज्यातील पाण्याची भीषण समस्या लक्षात घेऊन बीसीसीआय न्यायालयापुढे हा प्रस्ताव ठेवणार आहे.’’ याबाबत विस्तृतपणे बोलताना त्यांनी सांगितले, की व्हीसीए स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे ३ सामने होणार होते; पण पाणीसंकटामुळे हे सामने मोहालीत हलविण्यात येऊ शकतात.
मोहाली किंग्ज पंजाबचे होम ग्राऊंड आहे. दुसरे होम ग्राऊंड म्हणून या संघाने व्हीसीएची निवड केली होती. पुण्यातून हलविण्यात येणाऱ्या दोन सामन्यांबाबत शुक्ला म्हणाले, ‘२५ आणि २७ मे रोजी खेळले जाणारे हे दोन्ही प्लेआॅफ सामने आहेत. राज्यात आयपीएलचे एकूण १९ सामने खेळविले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना मुंबईत ९ एप्रिलला पार पडला. आता १८ सामने शिल्लक आहेत. त्यातील पाच सामने शिफ्ट होतील. उर्वरित १३ सामन्यांपैकी मुंबई (सात सामने) आणि पुण्यात (सहा) सामने आहेत. या १३ सामन्यांच्या आयोजनाबाबत विचारताच शुक्ला म्हणाले, ‘मुंबई आणि पुण्यात आयपीएलसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात येत नाही. मुंबईत सिवरेजचे पाणी वापरण्यात येत असून पुण्यात वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाण्याचा वापर होत आहे. आयपीएल फ्रॅन्चायझींना आयोजनात त्रास होऊ शकतो, असे सामने शिफ्ट करण्यावर बीसीसीआय भर देत आहे. यादृष्टीने नागपुरातील तीन आणि पुण्यात होणाऱ्या दोन प्लेआॅफ सामन्यांचे आयोजन इतरत्र होऊ शकते.’ (क्रीडा प्रतिनिधी)