तोतया ‘आयपीएस’ अधिका-याला गुन्हे शाखेकडून अटक
By Admin | Published: March 9, 2017 07:32 PM2017-03-09T19:32:41+5:302017-03-09T19:32:41+5:30
विशेष शाखेचा पोलीस उपायुक्त असल्याचे भासवत एका व्यावसायिकाचे गुटखा विक्रीच्या संशयावरुन अपहरण करुन
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 9 - विशेष शाखेचा पोलीस उपायुक्त असल्याचे भासवत एका व्यावसायिकाचे गुटखा विक्रीच्या संशयावरुन अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागणा-या तोतयाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून वावरणा-या सहा जणांनाही गजाआड करण्यात आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
भास्कर विजय शिर्के (रा. आंबेगाव पठार, कात्रज) असे अटक तोतयाचे नाव आहे. त्याच्यासह सोहेब महंमद शेख (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), आकाश नवनाथ जठार (वय २३, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), शंकर गुलाब मुजुमले (वय २९, रा. न-हे गाव, मानाजीनगर), विकास विलास गव्हाणे (वय २३, रा. कोंढणपूर, सोपानबाग), रविंद्र सोनबा खाटपे (वय २२, रा. कोंढणपूर) यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे कर्मचारी संजय जगताप यांना शिर्के हा स्वत:ला विशेष शाखेचा उपायुक्त असल्याचे भासवत असून तो आणि त्याचे सहकारी भारत सरकार लिहिलेल्या दोन मोटारींमध्ये बसून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, नवले पुलाजवळ सापळा लावण्यात आला. दोन मोटारींमधून आलेल्या शिर्के वगळता अन्य सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. आरोपींनी या व्यावसायिकाला फोन करुन व्यवस्थापक पांडे याला अंमली पदार्थांची विक्री करताना पकडल्याचे सांगितले. त्यांना कात्रज चौकामध्ये बोलावून घेतले असता दोन मोटारीमध्ये आरोपी बसलेले होते. पुढच्या मोटारीत शिर्केसह काहीजण होते. तर पाठीमागील मोटारीत तिघाजणांनी पांडे याला धरुन ठेवलेले होते. त्यांना मोटारीत बसवून आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजजवळील एका इमारतीमधील खोलीत नेले. त्यांना डांबून ठेवत मारहाण करीत पांडेला आणि त्यांना सोडण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितली. त्यांच्याजवळील दहा हजार रुपये काढून घेत भारती विद्यापीठाजवळ सोडले. ही फिर्याद दाखल झाल्यावर गुन्हे शाखेकडून समांतर तपासाला सुरुवात करण्यात आली होती.
आरोपींना पकडण्यात आले तेव्हा त्यांनी विशेष सरकारी अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी एकसारखेच सफारी कपडे घातलेले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचा म्होरक्या भास्कर शिर्के हा फरासखाना पोलिसांच्या ताब्यात असून आम्ही बाहेरगावी पळून जात होतो असे सांगितले. आरोपींना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक एस. व्ही. शिंदे यांच्या पथकाने केली.
आरोपी भास्कर शिर्के याने त्याच्या घराच्या दारावरही उपायुक्त असल्याची पाटी लावली होती. तो अविवाहीत असून आईवडीलांपासून वेगळीकडे राहतो. शिर्के याच्या मित्राला दोन दिवसांपुर्वी दगडुशेठ मंदिराजवळील बुधवार चौकामध्ये वाहतूक पोलिसांनी पकडले होते. त्याच्या मित्राने पोलिसांना शिर्के याचा फोन लावून दिला. वाहतूक पोलिसांना त्याने आपण विशेष शाखेचा उपायुक्त बोलत असल्याचे सांगितले. वाहतूक पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला वाहतूक शाखेत बोलावून घेण्यात आले. दरम्यान, फरासखाना पोलिसांना माहिती कळवण्यात आली. त्यांनी वाहतूक शाखेजवळच शिर्केला ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली. त्याच्यावर केवळ 151 (1) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. फरासखाना पोलिसांनी सखोल तपास केला असता तर गुन्हे शाखेने उघडकीस आणलेला गुन्हा त्यांना उघडकीस आणता आला असता. वास्तविक त्याच्यावर वाहतूक पोलिसांना अधिकारी असल्याची खोटी बतावणी केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा तरी गुन्हा दाखल व्हायला हवा होता.