इक्बाल कासकरला पुन्हा पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:19 AM2018-02-27T03:19:30+5:302018-02-27T03:19:30+5:30

खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला सोमवारी पोलिसांनी पुन्हा कोठडीत घेतले.

 Iqbal Kaskar again gets police custody | इक्बाल कासकरला पुन्हा पोलीस कोठडी

इक्बाल कासकरला पुन्हा पोलीस कोठडी

Next

ठाणे : खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला सोमवारी पोलिसांनी पुन्हा कोठडीत घेतले. ठाणेनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे.
ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना सप्टेंबर महिन्यात अटक केली. एका बिल्डरची गोराई येथे ३८ एकर जमीन होती. तिच्या विक्रीचा सौदा व्यावसायिकाशी करून, त्याच्याकडून २ कोटी रुपये अग्रिम रक्कम बिल्डरने घेतली. मात्र, व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे बिल्डरने किंमत दुपटीने वाढवली. जमिनीचे भाव वाढले असले तरी सौदा आधीच झाला असल्याने व्यावसायिकाने वाढीव किंमत देण्यास नकार दिला. त्याने व्यवसायिकाला बाजूला करण्यासाठी एजंटशी संपर्क साधला. त्यातून इक्बालचा यात प्रवेश झाला. अग्रिम म्हणून घेतलेले २ कोटी आणि स्वत:जवळचे १ कोटी अशी एकूण ३ कोटी रुपयांची खंडणी कासकरने बिल्डरकडून उकळली. त्याच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी ३ आॅक्टोबर २0१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. यासाठी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने इक्बालच्या कोठडीची मागणी न्यायालयास केली. न्यायालयाने ती मान्य करून ६ मार्चपर्यंत इक्बालला पोलिसांच्या ताब्यात दिले.
अनिस इब्राहिमने दिल्या होत्या धमक्या
ठाणेनगर पोलीस ठाण्यातील हा गुन्हा खंडणीविरोधी पथकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या गुन्ह्याच्या फिर्यादीनुसार तक्रारदारास अनिस इब्राहिमने खंडणीसाठी धमकावले होते. याशिवाय दाऊद इब्राहिमच्या नावाचा उल्लेखही या फिर्यादीमध्ये आल्याने पोलिसांसाठी या प्रकरणाचा तपास महत्त्वाचा राहणार आहे.

Web Title:  Iqbal Kaskar again gets police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.