इक्बालसिंह चहल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव; शुक्रवारी झाली नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:08 AM2024-03-23T09:08:15+5:302024-03-23T09:13:17+5:30
चहल हे गगराणी यांची मुख्यमंत्री कार्यालयातील जागा घेतील अशी चर्चा होती. ‘लोकमत’ने तसे वृत्तदेखील दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ज्येष्ठ सनदी अधिकारी इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर शुक्रवारी राज्य सरकारने नियुक्ती केली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर चहल यांची अलीकडेच मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती आणि त्यांच्या जागी भूषण गगराणी हे नवीन आयुक्त झाले.
चहल हे गगराणी यांची मुख्यमंत्री कार्यालयातील जागा घेतील अशी चर्चा होती. ‘लोकमत’ने तसे वृत्तदेखील दिले होते. चहल यांना मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला.
सामाजिक न्याय विभागाचे पी. वेलारसू सचिव
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरून बदली झालेले पी. वेलारसू सामाजिक न्याय विभागाचे सचिव झाले आहेत. या विभागात सचिव असलेले सुमंत भांगे हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असतील.