आयर्लंडचे पंतप्रधान उकडीच्या मोदकांचे फॅन
By admin | Published: June 3, 2017 03:26 AM2017-06-03T03:26:14+5:302017-06-03T03:26:23+5:30
आयर्लंडचे पंतप्रधान झालेले कोकणचे सुपुत्र लिओ वराडकर मराठी खाद्यपदार्थांच्या विशेष प्रेमात आहेत. ‘आजही त्यांच्या जेवणात आठवड्यातून
संकेत सातोपे / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयर्लंडचे पंतप्रधान झालेले कोकणचे सुपुत्र लिओ वराडकर मराठी खाद्यपदार्थांच्या विशेष प्रेमात आहेत. ‘आजही त्यांच्या जेवणात आठवड्यातून एकदा तरी भारतीय, त्यातही मराठी पदार्थ आवर्जून असतात. कोकणात केले जाणारे उकडीचे मोदक म्हणजे लिओचा जीव की प्राण!’ मुंबईत राहणारी लिओची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी त्यांच्या कौटुंबिक आठवणींना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला.
लिओ यांचे दोन्ही काका मधुकर आणि मनोहर वराडकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यातही मधुकर यांनी मालवणचे महापौरपदही भूषविले होते. आपल्या वाडवडिलांच्या या कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा लिओ यांना जाज्वल्य अभिमान आहे. ते अनेकदा मुंबईत येऊन गेले आहेत आणि प्रत्येक वेळी ते वराडकर कुटुंबियांना आवर्जुन भेटले आहेत. त्यांना भरपूर वेळ देतात, असेही शुभदा यांनी सांगितले.
शुभदा आणि त्यांची भाची मिताली वराडकर या ओडिसी नर्तिका आहे. कार्यक्रमांनिमित्त त्यांचे अनेकदा विदेशात जाणे होते. ‘आम्ही दोघी आयर्लंडला गेलो होतो. तेव्हा लिओ यांनी आम्हाला आवर्जुन आयरिश संसद फिरवून आणली,’ अशी आठवण मिताली सांगते.
माझी काकी (लिओ यांची आई) आयरिश आहे, मात्र त्यांचेही भारतीय संस्कृती-खाद्यपदार्थांवर विशेष प्रेम आहे. लिओ यांना तर भारतीय इतिहास, राजकारण याबाबत पहिल्यापासून ओढ आहे. लहानपणीही आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा तेव्हा त्यांनी मला भारताच्या इतिहास आणि राजकारणाबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
खरंतर कायद्याचे शिक्षण घेण्याची त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती. पण घरात आई-वडिल, बहिण सगळेच वैद्यकीय पार्श्वभूमीचे असल्यामुळे त्यांनीही डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. मुुंबईत केईएममध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून वर्षभर काम करताना त्यांना भारतीय संस्कृती आणखी जवळून अनुभवता आली, असेही शुभदा यांनी सांगितले.