उंची वाढविण्यासाठी युवकाने केसात लपविली लोखंडी पट्टी
By admin | Published: March 31, 2017 02:04 AM2017-03-31T02:04:44+5:302017-03-31T02:04:44+5:30
पोलिसांना फसविण्याचा प्रयत्न फसला!
अकोला, दि. ३0- पोलीस भरतीदरम्यान एका युवकाने उंची वाढविण्यासाठी डोक्यातील केसांमध्ये चक्क लोखंडी पट्टी लपवून ठेवली; परंतु चाणाक्ष पोलिसांच्या ही बाब ध्यानात आल्यावर त्याला बाजूला काढत, त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर २२ मार्चपासून पोलीस भरती सुरू आहे. या भरतीमध्ये राजपुर्यातील करण राजकुमार घोडके (२१) हासुद्धा पोलीस भरतीत सहभागी झाला. पोलीस दलात सहभागी होण्यासाठी आपली उंची कमी पडेल, असे वाटल्यामुळे करणने १६५ सें.मी. उंची भरावी, या उद्देशाने त्याने डोक्यातील केसांमध्ये लोखंडी पट्टी लपविली आणि तो गुरुवारी पोलीस भरतीसाठी आला. भरतीदरम्यान त्याची शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात आली. यावेळी तैनात पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी तपासणी केली. तपासणीदरम्यान करण घोडके याने डोक्यातील केसांमध्ये लोखंडी पट्टी लपविली असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला बाजूला काढले. पोलिसांना मामू बनविण्याचा करणचा प्रयत्न सपशेल फसला. यापूर्वी नाशिक येथील पोलीस भरतीमध्ये एका युवकाने उंची वाढविण्यासाठी डोक्यावर विग काढल्याची घटना ताजीच आहे. त्यानंतर अकोल्यात दुसरी घटना घडली. विशेष म्हणजे, गतवर्षीसुद्धा करण घोडके हा पोलीस भरतीत सहभागी झाला होता; परंतु उंची कमी पडल्यामुळे त्याला पात्रता फेरीतून बाद व्हावे लागले होते. यंदा उंची भरून काढायची आणि पोलीस दलात सहभाग व्हायचे, असा चंगच त्याने बांधला होता आणि येथेच त्याची बनवेगिरी उघडकीस आली. पोलीस कर्मचारी गीतेश कांबळे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी करणविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.