लोखंडी खाटेने आखले शेत..!
By Admin | Published: June 28, 2016 03:50 AM2016-06-28T03:50:59+5:302016-06-28T03:50:59+5:30
शेतकऱ्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. खाटेने शेत आखतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावरुन सर्वत्र फिरत आहे.
जळगाव : कितीही संकटे आली तरी इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतो. औताचे भाडे देण्याएवढे पैसे गाठिशी नसतानाही परिस्थितीपुढे हार न मानता लोखंडी खाटेने शेत आखून दोन एकरात कपाशीची लागण पूर्ण केली.
खडकी बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील विठोबा हरी मांडोळे या जिगरबाज शेतकऱ्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. खाटेने शेत आखतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावरुन सर्वत्र फिरत आहे.
मांडोळे हे सुरुवातीला शेतमजुरीचे काम करायचे मात्र गेल्या सात वर्षांपासून इतरांचे शेत कसायला घेवून ते स्वत: शेती करीत आहेत.
या दरम्यान त्यांनी मेहनतीतून बऱ्यापैकी प्रगती साधली. वयाच्या पंचेचाळीशीनंतर स्वत:चे घरही उभे केले. बैल जोडी घेतली. मात्र गेल्या दोन वर्षातील दुष्काळी परिस्थितीने त्यांना आर्थिक विवंचनेत टाकले. गेल्या वर्षी तर अधिकच नुकसान झाले. चारा- पाणी नसल्याने यंदा बैलजोडीही विकावी लागली.
हे सर्व आघात सहन करीत असताना यंदा नव्या उमेदीने ते पुन्हा उभे राहिले आहेत. तीन एकर शेत त्यांनी कसायला घेतले असून शेतात सऱ्या पाडण्यासाठी औताचे भाडे देण्याची ऐपत नसल्याने त्यांनी लोखंडी खाटेने शेत आखून दोन एकरात कपाशीचे बियाणे लावले आहे.
उर्वरीत एक एकरात मक्याचे बियाणे लावणार असून हे बियाणे त्यांनी उधारीवर आणले आहे. निसर्गाने साथ दिली, चांगला पाऊस पडला तरच कापूस आणि मका शेती बहरेल आणि आयुष्याचा सारा मोहोर फुलून जाईल, अशी आशा ते व्यक्त करतात. (प्रतिनिधी)
>नुकसानीस पात्र नाही
मांडोळे यांनी दुसऱ्याची शेती कसायला घेतली आहे. त्यामुळे त्याचा स्वत:चा ७/१२, खाते उतारा नसल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस ते पात्र ठरत नाही.
कृषी विभागातर्फे कपाशी बियाणे, तूर बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इ. मिळण्यासाठी त्यास मदत केली जाईल, असे चाळीसगावचे तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत यांनी सांगितले.