लोखंडाला आकार देता देता हरवला आयुष्याचा आकार!
By admin | Published: April 27, 2015 03:30 AM2015-04-27T03:30:33+5:302015-04-27T03:30:33+5:30
गावाबाहेर रस्त्यालगत फडफडणारी फाटके पाल, अर्धनग्न अवस्थेत खेळणारी निरागस मुलं, अशा स्थितीत लोखंडासारख्या मजबूत धातूला आकार देता देता
निनाद देशमुख, रिसोड (वाशिम)
गावाबाहेर रस्त्यालगत फडफडणारी फाटके पाल, अर्धनग्न अवस्थेत खेळणारी निरागस मुलं, अशा स्थितीत लोखंडासारख्या मजबूत धातूला आकार देता देता लोहार बांधव स्वत:च्या आयुष्याला मात्र आकार देऊ शकले नाहीत. विकासाच्या कितीही गप्पा वेगवेगळ्या पक्षांच्या सत्तारूढ सरकारांकडून केल्या जात असल्या तरी या समाजाच्या नशिबी आजही भटकंतीच आहे. कोणत्याही एका गावात फार काळ वास्तव्य नसल्याने या समाजातील बहुतांश कुटुंबांकडे शासनाचे कोणतेही ओळखपत्र नाही, परिणामी कोणतेही अनुदान नाही... या देशाचे आपण नागरिक आहोत, याचा एकही पुरावा त्यांच्याकडे मिळत नाही.
पूर्वीपासूनच या देशाची ग्रामीण संस्कृती बारा बलुतेदारांवर अवलंबून होती. ग्रामीण भागात कृषिप्रधान संस्कृती असल्याने शेतीसाठी लागणारे साहित्य तयार करणारा एकमेव कारागीर म्हणजे लोहार बांधव़ वैज्ञानिक क्रांतीचा बदल कृषी संस्कृतीवर झाला.
याचा फटका बारा बलुतेदारांंच्या व्यवसायावर झाला. काही बलुतेदारांनी वेगवेगळे व्यवसाय स्वीकारले; परंतु लोहार समाजबांधव पूर्वीच्याच भटकंती अवस्थेत असल्याचे दिसून येते.
रस्त्यालगत एखादी फाटकी-तुटकी पाल उभारून दोन-चार भांडी, एखादं कुत्र्याचं पिलू, ऐरण, भाता व कोळशाचं मळकट पोतं हेच जीवन आणि हीच मालमत्ता... लोहार समाजबांधवांची ही परिस्थिती आजही कायम असल्याचे बघायला मिळते; मात्र आता शेतात पेरण्याकरिता जाणारी तिफन हद्दपार होऊन ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र कंपन्यांमधून येत असल्याने तिफनीच्या फाळाला धार लावणारा लोहार बिनकामाचा ठरत आहे. तिफनच कालबाह्य झाल्याने मातीच्या ओलाव्यापासून हा समाज पारखा झाला आहे.
पाल मांडल्यावर गावात कामाचा धांडोळा घेणारा लोहार व त्याच्या येण्याची वाट पाहणारी, घनाच्या साहाय्याने लोखंडाला आकार देणारी अर्धांगिनी, धुळीत माखलेली, पोटातील भूक डोळ्यात आणून बापाची वाट बघणारी निरागस मुलं पाहिल्यानंतर स्वातंत्र्य, जागतिक महासत्तेकडे वाटचाल, वैज्ञानिक क्रांती या कल्पना बेगडीच वाटतात.
एका गावात वास्तव्य नसल्याने वास्तव्याचा दाखला नाही. परिणामी तो कुठलाही मतदार नाही. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नाही, अनुदान नाही, असं जिणं रिसोड शहरात पालं मांडून बसलेल्या समाजबांधवांच्या नशिबी आलं आहे. लोखंडाला आकार देताना लोहाराच्या पिढ्यांचा आकार हरपत असल्याचं वास्तव दिसत आहे.