जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 03:41 PM2019-06-24T15:41:05+5:302019-06-24T15:44:28+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे.
मुंबई : जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे अनेकदां विरोधी पक्षाच्यावतीने आरोप करण्यात आले आहे. मात्र पहिल्यांदाच सरकारने या योजनेत गैरव्यवहार झाले असल्याचे मान्य केलं आहे. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे. पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी सुद्धा केली असल्याची माहिती, तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
राज्यात सूर असलेल्या जलयुक्ताच्या कामांबद्दल जिथे जिथे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशा १३०० जलयुक्त शिवाराच्या कामांची विभागीय चौकशी सुरु केली असल्याचा खुलासा सावंत यांनी केला. तसेच याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही याचा सिद्ध निर्णय घेऊ, असे सावंत म्हणाले.
राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणातील तत्कालीन कृषी आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी दिरंगाई का केली जात आहे असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता. पुढे बोलताना मुंडे यांनी, गैरव्यवहारात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात एसीबी मार्फत चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली होती. यालाच उत्तर देताना सावंत यांनी वरील खुलासा केलं आहे.