सिंचन प्रकल्प कोरडेठाक
By Admin | Published: July 18, 2016 04:39 AM2016-07-18T04:39:06+5:302016-07-18T04:39:06+5:30
जुलै महिन्याच्या सुरूवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे अजूनही कोरडीच आहेत.
औरंगाबाद : जुलै महिन्याच्या सुरूवातीला दमदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील धरणे अजूनही कोरडीच आहेत. विभागातील सर्व धरणांमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी ४.५४ टक्के इतकाच जलसाठा होऊ शकला आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यंदा भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. शेकडो गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अजूनही अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जुनअखेरीस मराठवाड्यातील सर्व धरणे कोरडी पडली होती. विभागातील पाणीसाठा अर्ध्या टक्क्यांवर आला होता.
जुलैच्या सुरूवातीला सर्वदूर दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली. परंतु अजूनही विभागातील धरणे रिकामीच आहेत. १५ जुलैच्या अखेरीस धरणांमध्ये अवघा साडेचार टक्के इतकाच पाणी साठा होऊ शकला आहे. (प्रतिनिधी)
>८ प्रकल्पात मृतसाठा
मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२१ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीसह आठ मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच आहेत. केवळ तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम १६४ दलघमीचा साठा होऊ शकला आहे. त्यामध्ये निम्न दूधना, विष्णुपुरी आणि पेनगंगा धरणाचा समावेश आहे.
‘गोदावरी’चे बंधारेही कोरडेठाक
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी गोदावरी नदीवर जायकवाडीपासून नांदेडपर्यंत ११ बंधारे बांधले. त्यांची क्षमता २३१ दलघमीची आहे. मात्र हे बंधारेही अद्याप कोरडेच आहेत. मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी आले आहे. या १८ बंधाऱ्यांमध्ये आतापर्यंत केवळ ३ दलघमी म्हणजे ३.५ टक्केच पाणीसाठा होऊ शकला.
पाणीपुरवठा बंदच
मध्यम प्रकल्पांची स्थितीही अद्याप सुधारलेली नाही. मराठवाड्यातील ७५ मोठ्या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ५४ दलघमी (५.८३ टक्के) साठा आहे. त्याचप्रमाणे विभागातील ७३२ लघू प्रकल्पांमध्ये ११७ दलघमी म्हणजे केवळ ७.३५ टक्के साठा आहे. धरणांमध्ये पुरेसे पाणी न आल्यामुळे शेकडो गावातील पाणी पुरवठा योजना अजूनही बंदच आहेत.