सिंचन घोटाळाप्रकरणी विरोधक कमी पडले
By admin | Published: July 7, 2014 03:27 AM2014-07-07T03:27:07+5:302014-07-07T03:27:07+5:30
काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळा उघडकीस आणला. मात्र हा घोटाळा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणायला हवा होता.
अहमदनगर : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळा उघडकीस आणला. मात्र हा घोटाळा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणायला हवा होता. त्यामध्ये ते कमी पडले, असे सांगून नाव न घेता विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अप्रत्यक्ष हल्ला केला.
राज्यातील सिंचन योजनांवर ७५ हजार कोटी रुपये खर्च केले तरी राज्यामध्ये सिंचनाचा पत्ता नाही. आघाडी सरकारने अनेक घोटाळ्यांची चौकशी केली, भ्रष्टाचार मान्य केला, मात्र कोणावरही कारवाई झाली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना संपविण्याचे खरे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केले आहे, अशी टीकाही कदम यांनी केली.
जिल्ह्यामध्ये सारोळा बद्दी आणि नगर येथे भगवा सप्ताह आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले असता शासकीय विश्रामगृहावर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार घर तिथे शिवसेना अभियान राबविण्यात येत आहे. गरीब-शेतकरी यांना न्याय देण्यासाठी राज्यात बदल हवा आहे.
युती अभेद्य
शिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. कार्यकर्त्यांना भावना असतात, त्या ते व्यक्त करतात. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन अशा नेत्यांनी ही युती तयार केली आहे, ती तुटणे अशक्य आहे.
लोकसभेला भाजपाला जास्त जागा आणि विधानसभेला शिवसेनेला जास्त जागा हे युतीचे सूत्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ, तर भाजपा लहान भाऊ आहे. लोकसभेत उलटे आहे. शिवसेनेने कधी पंतप्रधानपदावर दावा केला का? असे सांगून रामदास कदम यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहील, हे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)