कृषी पंपाच्या वीज जोडण्यांअभावी सिंचनाचा अनुशेष वाढला !
By admin | Published: June 9, 2016 02:06 AM2016-06-09T02:06:07+5:302016-06-09T02:06:07+5:30
अकोला येथे पत्रपरिषदेत बच्चू कडू यांनी महावितरणसह राज्य सरकारवर आरोप केला.
अकोला : चार वर्षांपूर्वी अर्ज केलेल्या आणि पैसे भरलेल्या शेतकर्यांच्या कृषिपंपांना अद्यापही वीज जोडणी मिळत नाही. वीज जोडण्यांअभावी विदर्भात सिंचनाचा अनुशेष वाढत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केला.
अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रहार संघटना जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित ह्यजनता दरबारह्णमध्ये ३00 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये प्रामुख्याने महावितरणसंबंधी सर्वाधिक तक्रारी आहेत. सन २0१२-१३ पासून अर्ज केल्यानंतर आणि पैसे भरल्यानंतरही शेतकर्यांना कृषिपंपांसाठी अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सिंचनाची कामे होत असली, तरी वीज जोडण्यांअभावी सिंचनाचा अनुशेष वाढत आहे, ही मोठी शोकांतिका असून, शेतकरी जगणार कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पैसे भरूनही कृषिपंपांना चार-पाच वर्षे वीज जोडणी मिळत नसेल, तर पुन्हा शेतकरी आत्महत्या वाढतील, असे आ. कडू यांनी सांगितले.
जनता दरबारात महसूल, जिल्हा परिषदसह विविध विभागाच्या ३00 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १00 तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, कुरणखेड येथील शहीद विनोद यशवंत मोहोड स्मारकासाठी जागा मागणीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे विविध विषयांसंबंधी प्रशासनाची प्रचंड अनास्था असल्याचा आरोप आ.कडू यांनी यावेळी केला. यावेळी डॉ.दीपक धोटे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाकधणे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.रणजित पाटील यांचे काम शून्य !
गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील यांनी गेल्या पाच वर्षात बेरोजगार काय असतो, याबाबत कानोसाही घेतला नाही. अमरावतीमध्ये त्यांनी बेरोजगारांचा महारोजगार मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी संबंधित कंपनीच्या ह्यएजंटह्णचे काम केले असून,बेरोजगारांची थट्टा केली, असा आरोप आ.बच्चू कडू यांनी यावेळी केला. निवडणुकीच्या काळात बेरोजगारांची अशी थट्टा करु नये, असे सांगत नोकर भरतीत समन्यायाचे वाटप झाले पाहिजे, यासाठी डॉ.पाटील आग्रह कधी धरणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेण्याचा निर्णय प्रहार संघटनेने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र!
विदर्भातील अनुशेषाबाबत सत्तेत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिटरभर रक्त आटवलं. सत्तेत आल्यानंतर विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी आता त्यांनी थेंबभर रक्त आटवलं पाहिजे; मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विदर्भ अनुशेषाचा विसर पडला आहे, अशी टीकादेखील आ.कडू यांनी यावेळी केली.