सिंचन क्षेत्र ‘जैसे थे’च!
By admin | Published: April 17, 2016 02:42 AM2016-04-17T02:42:39+5:302016-04-17T02:42:39+5:30
सध्या राज्याचे पाणी व शेतीचे अधिकार जळगावकडे आहेत. राज्यकर्त्यांनी पाण्यासंबंधीच्या धोरणाला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु मागील दीड वर्ष सिंचन प्रकल्पांसाठी
जळगाव : सध्या राज्याचे पाणी व शेतीचे अधिकार जळगावकडे आहेत. राज्यकर्त्यांनी पाण्यासंबंधीच्या धोरणाला पहिल्या क्रमांकाचे प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु मागील दीड वर्ष सिंचन प्रकल्पांसाठी गुंतवणूक झाली नाही. राज्याचे एक टक्का सिंचन क्षेत्रही वाढले नाही. मराठवाडा, खान्देशात बिकट स्थिती आहे. ही राज्यासाठी अशोभनीय बाब असल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली. जैन हिल्सवर आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री पतंगराव कदम, कविवर्य ना.धों. महानोर, राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. या वेळी ‘डाळिंब रत्न’ व ‘हिरालाल जैन डाळिंब नव तंत्र’ पुरस्काराने शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.
शरद पवार म्हणाले, पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. टीव्ही सुरू केला की पाणीप्रश्नाचीच चर्चा सुरू असते. सत्ता येते व जाते. सत्ता हा मुद्दा नाही. परंतु जनतेशी बांधिलकी महत्त्वाची आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळायला हवे. या प्रश्नासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत, सहकार्य करायला तयार आहोत.
पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, पश्चिम उत्तर प्रदेश, दाक्षिणात्य राज्यातील काही भागांमध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असणारी
केळी व ऊस ही पिके घेणे बंद केले पाहिजे.
गव्हासारखी पिके वर्षभरात दोनदा घ्यावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. ज्यांना अधिक वेळ शेतीसाठी द्यायचा नाही त्यांनी ऊस लावावा. पण ज्यांना पैसे हवे आहेत त्यांनी डाळिंब लावायला हवे. पण शेती करताना सोसायट्या, ग्रा.पं. निवडणुकीच्या भानगडीत पडू नका, असेही पवार यांनी सांगितले.
जैन हिल्स शेतकऱ्यांची पंढरी
राज्यात चांगली शेती करणारे लोक जळगावात आहेत. भागवत पाटील, वसंतराव महाजन, डी.के. महाजन अशी अनेक नावे पवार यांनी आपल्या भाषणात घेतली. जळगाव शेतीचे केंद्र बनत आहे, त्यातच जैन हिल्स शेतकऱ्यांची पंढरी आहे. स्व. भंवरलाल जैन यांनी शेतीसंबंधी केलेल्या कार्याचा देशाला लाभ होत असल्याचेही पवार म्हणाले.