समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:10 PM2024-10-17T12:10:17+5:302024-10-17T12:16:10+5:30

IRS Sameer Wankhede : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहे.

IRS Sameer Wankhede will contest the Maharashtra Assembly Elections 2024 from the Mahayuti in Dharavi Mumbai | समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

IRS Sameer Wankhede : मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची समोर येत आहे. समीर वानखेडे हे महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याचे समजते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहे. तसेच, समीर वानखेडे मुंबईतीलधारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याबाबत समीर वानखेडे यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर त्यांचा राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटप सुरू असून केव्हाही उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धारावीमध्ये वर्षा गायकवाड आमदार होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या जागी त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे. जर ज्योती गायकवाड यांनी उमेदवारी मिळाली, तर यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्योती गायकवाड आणि महायुतीकडून समीर वानखेडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. 

या प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत
समीर वानखेडे आयआरएस अधिकारी आहेत. कार्डिलिया क्रूझ प्रकरणावेळी समीर वानखेडे चर्चेत आले होते. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर कार्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती. या प्रकरणावेळी समीर वानखेडे अडचणीत सापडले होते. समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Web Title: IRS Sameer Wankhede will contest the Maharashtra Assembly Elections 2024 from the Mahayuti in Dharavi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.