लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना ५०० रुपयेच मिळणार? राज्यमंत्र्यांनी खरे काय ते सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:33 IST2025-04-15T17:32:02+5:302025-04-15T17:33:53+5:30
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात असताना अनेकविध दावेही केले जात आहेत.

लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना ५०० रुपयेच मिळणार? राज्यमंत्र्यांनी खरे काय ते सांगितले
Ladki Bahin Yojana: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेली आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. परंतु, याची पूर्तता कधी होईल, याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे. यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्याला राज्याच्या राज्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
लाडक्या बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा दिले जाणाऱ्या १५०० रुपयांत घर चालते का? पण ज्या महिलांना कुटुंबात आधार नाही, अशा महिलांना सरकार १५०० रुपये देत होते, त्यांना फायदा झाला असता. आता लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपयेच दिले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयाची कीव करावीशी वाटते. हे फार दुर्दैवी आहे. सरकारने मतासाठी त्यावेळस सरसकट महिलांना लाभ दिला आणि मत घेतली. मात्र, आता ही योजना गुंडाळण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लृप्त्या काढणे हे निंदनीय आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. ज्यावेळेस ही योजना लागू केली, त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारच्या बुद्धीला लकवा मारला होता का? या शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. याला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उत्तर दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.
लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना ५०० रुपयेच मिळणार?
आशिष जयस्वाल यांनी यासंदर्भातील दावे फेटाळून लावले. ते म्हणाले की, ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा केली जाईल, तेव्हा ही बाब वेबसाईटवर जाहीर केली जाईल. मूळ जीआरमध्ये ज्या गोष्टी नमूद होत्या, त्या बाबी अनुसरून सर्व पात्र महिलांना या योजनेतील पैसे मिळतील. ही योजना यापुढेही सुरू राहील, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या महसुलात वाढ झाल्यावर त्याचे योग्य नियोजन करण्याकरिता विविध विभागांना त्या निधीचे वितरण केले जाते. त्यामुळे ज्या दिवशी महसूल वाढेल तेव्हा सर्व नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजनातील पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने सरकार दिलेल्या वचनांची पूर्तता करेल, असे आश्वासन जयस्वाल यांनी दिले.