छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 06:44 PM2024-03-29T18:44:28+5:302024-03-29T18:45:27+5:30
खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आहोत.
अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार, असे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते. खरे तर, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे. या बैठकीत दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.
पत्रकारांसोबत बोलताना खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आहोत. यावेळी, साहेबांशी बोलणे झाले का? असा प्रश्न विचारला असता खैरे म्हणाले, हो झाले. या भेटीवेळी दानवे बरोबर होते का? असे विचारले असता खैरे म्हणाले, नाही, टेलिफोनिक चर्चा झाली. मग नाराजी दूर झाली का? असे विचारले असता, हो झाली. आता आम्ही दोघेही हातात हात घेऊन काम करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार, असे खैरे यांनी म्हटले आहे.
"जलील आता काहीच नाही, संपला तो" -
छत्रपती संभाजीनंगरमध्ये महायुतीने अद्यापही उमेदवार दिलेला नाही, यासंदर्भात बोलताना, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटातात भांडण सुरू झाले आहे. दोघेही म्हणत आहेत आम्हाला द्या आम्हाला द्या. त्यांच्यातच भांडण सुरू झाले आहे. यावेळी, आपल्याला काय वाटते, कोण असेल आव्हानात्मक जलील असतील की...? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, खैरे म्हणाले, "जलील आता काहीच नाही, संपला तो. यामुळे तो परवापासून एकदम शांत बसला आहे. मात्र येथे काही असले तरी, आमच्या विरोधात कुणीही असले तरी, आपण त्याला खूप मोठे समजायचे की नाही? आणि पाडायचे. ही भूमिका ठेवायची."
याच वेळी, वंचित संदर्भात बोलताना, वंचित नसले तरी आमचे बरेच मित्र तेथे आहेत. त्यांच्यासोबत आमची चर्चाही सुरू आहे, असेही खैरे यांनी सांगितले.