फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:30 PM2024-11-27T12:30:02+5:302024-11-27T12:32:04+5:30

भाजप नेतृत्वाने शिंदे यांना नवा प्रस्ताव दिला असून यामुळे पुन्हा एकदा २०२२ सारखी राजकीय स्थिती राज्यात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Is Eknath Shinde situation similar to devendra Fadnavis Chances of a repeat of the 2022 incident | फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

Shiv Sena Eknath Shinde ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात आता मुख्यमंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरू आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा राज्याचं सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपकडून यंदा मुख्यमंत्रि‍पदाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत. भाजपचं केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यास अनुकूल असल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने शिंदे यांना नवा प्रस्ताव दिला असून यामुळे पुन्हा एकदा २०२२ सारखी राजकीय स्थिती राज्यात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेतील फुटीनंतर जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. तेव्हा मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. मात्र सरकार नीट चालण्यासाठी तुम्हाला सत्तेत सहभागी व्हावं लागेल, अशा सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आल्या आणि ५ वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. आता एकनाथ शिंदे यांच्याबाबतही याच घटनेची पुनरावृत्ती होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

भाजप नेतृत्वाकडून शिंदेंना कोणती ऑफर?

मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर मी सत्तेबाहेर राहतो, अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याचे समजते. मात्र शिंदे यांची ही भूमिका भाजप नेतृत्वाला मान्य नाही. तुम्ही स्वत: सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, असा आग्रह भाजप नेतृत्वाने शिंदे यांच्याकडे धरला आहे. त्यामुळे मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या भेटीगाठी टाळल्या

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर मुख्यमंत्रि‍पदावर शिक्कामोर्तब होण्यास विलंब होत असल्याने एकनाथ शिंदे यांनी सध्या मौन बाळगणे पसंत केले आहे. शिंदे यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं असून ते नवनिर्वाचित आमदारांच्या भेटीगाठी टाळत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या मनात नक्की चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: Is Eknath Shinde situation similar to devendra Fadnavis Chances of a repeat of the 2022 incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.