माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:24 PM2024-10-19T23:24:53+5:302024-10-19T23:28:57+5:30

Ladki Bahin Yojana Latest News in Marathi: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यावर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेंनी खुलासा केला आहे. 

is it ladki bahin yojana going to closed; Aditi Tatkare disclosure | माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 

माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 

Ladki Bahin Yojana News Update: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आयोगाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिल्याने ही योजना बंद होणार, अशीही चर्चा सुरू झाली आणि गोंधळ निर्माण झाला. त्यावर आता अदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

अदिती तटकरे यांनी एक पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार !! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत", असे अदिती तटकरेंनी म्हटलं आहे. 

याच संदर्भात त्या पुढे म्हणाल्या, "शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे."

"सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती", असे आवाहन अदिती तटकरेंनी केले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही याबद्दल खुलासा केला आहे. "या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्यानं अतिशय जबाबदारीनं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये", असे अजित पवारांनी म्हटले आहे.

नोव्हेंबरचा हफ्ता आचारसंहिता लागण्याआधीच जमा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देता येणार नसल्याची कल्पना असल्याने सरकारने नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. 

आता या योजनेचा पुढील हफ्ता डिसेंबर महिन्यात असेल. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन नवी सरकारही अस्तित्वात आलेले असेल. 

Web Title: is it ladki bahin yojana going to closed; Aditi Tatkare disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.