रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 08:16 IST2025-03-25T08:16:12+5:302025-03-25T08:16:33+5:30

तुम्ही तरुण कलाकारांचं व्यासपीठ हिरावून घेतलं. यालाच औरंगजेबी वृत्ती म्हणतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Is it treason to call a rickshaw driver a rickshaw driver shiv sena sanjay raut slams dcm eknath shinde | रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल

रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल

Shiv Sena Sanjay Raut: "कुणाल कामराने काहीही चुकीचं केलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं हा देशद्रोह असतो का? आपण औरंगजेबाला तसंच म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना. या लोकांनी नवीन शब्दकोश तयार केला असेल तर तसं सांगावं," असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कॉमेडी शोवरून निर्माण झालेल्या वादावर आपली भूमिका मांडली आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी गाणे तयार केल्याने शिंदेसेनेचे कार्यकर्ते कॉमेडियन कुणाल कामराविरोधात आक्रमक झाले आहेत. कामरा याने जिथं शोचं शुटिंग केलं होतं त्या सेटचीही शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"कुणाल कामरा चुकला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. त्याचा आणि माझा डीएनए सारखा आहे. आम्ही लढणारे लोक आहोत. तो कायदेशीर लढाई लढेल. तुम्ही गुंडगिरी करताय, पण बहुमत फार चंचल असतं, हे लक्षात ठेवा," असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

"माझे कुणाल कामरासोबत फोटो"

कुणाल कामरा याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुपारी घेतल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून कामरा याचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतचे फोटो व्हायरल केले जात आहेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "कुणाल कामरा याच्यासोबत माझे फोटो नक्कीच आहेत. पण कुणाल कामरा गेल्या अनेक वर्षांपासून कॉमेडी शो करतोय. तो या क्षेत्रात नवीन आला तेव्हा काँग्रेस पक्ष, मनमोहन सिंह, सोनिया गांधी यांच्यावर असे शो करायचा. हॅबिटॅट क्लबला मी अनेकदा जात असतो. काल त्यांचा स्टुडिओ तोडण्यात आला. तुमच्यावर टीका केल्यावर ती वास्तू अनधिकृत असल्याचं तुमच्या लक्षात आलं. तुम्ही तरुण कलाकारांचं व्यासपीठ हिरावून घेतलं. यालाच औरंगजेबी वृत्ती म्हणतात. कारण औरंगजेब मंदिरे तोडत होता, तुम्ही काल लोकशाहीचं मंदिर तोडलं. जर तुम्हाला अनधिकृत बांधकामं तोडायचीच असेल तर बुलडोझर मलबार हिलला फिरवा. सर्व मंत्र्‍यांच्या बंगल्यांमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे," असं संजय राऊत म्हणाले. 

Web Title: Is it treason to call a rickshaw driver a rickshaw driver shiv sena sanjay raut slams dcm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.