अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:27 IST2025-01-20T16:25:27+5:302025-01-20T16:27:03+5:30

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नेमणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Is it wrong to expect Eknath Shinde takes a firm stand on the discussion of displeasure over Guardian Minister list | अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका

अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका

Eknath Shinde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. कारण नाशिकमधून शिवसेनेचे दादा भुसे तर रायगडमधून भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र नाशिकमध्ये भाजपच्या गिरीश महाजन आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. मात्र त्याचवेळी आमच्या मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची अपेक्षा करण्यात वावगं काही नसल्याचं सांगत नाराज नेत्यांना शिंदे यांनी बळ दिलं आहे.

रायगडमधील शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "अपेक्षा करण्यात वावगं काय आहे? त्यांनी अनेक वर्षे रायगडमध्ये काम केलं आहे. अपेक्षा ठेवणं, मागणी करणं चुकीचं नाही. त्यामुळे मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे आम्ही तिन्ही नेते बसून यावर मार्ग काढू," असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

नाराज झाल्याने गाव गाठलं?

एकनाथ शिंदे हे अचानक दरे या त्यांच्या मूळ गावी पोहोचल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत बोलताना शिंदे यांनी म्हटलं की, "मी नाराज झाल्याच्या बातम्या चालवल्या जात आहे, पण तुम्हीच बघत आहेत की मी तर काम करतोय. मी गावी आलो की लगेच तुम्ही म्हणता मी नाराज आहे. नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट आपण हाती घेतलाय. हा प्रोजेक्ट मोठा असल्याने मला वारंवार गावी यावं लागणार आहे. पर्यटनाचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख निर्माण होईल. यासाठी जे कष्ट घ्यायचे असतील ते इथला एक भूमिपुत्र म्हणून मी घेईल." 

दरम्यान, "पालकमंत्रिपदाचा जो तिढा सुरू आहे त्यावर मार्ग निघेल. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नेमणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल," असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Is it wrong to expect Eknath Shinde takes a firm stand on the discussion of displeasure over Guardian Minister list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.