संजय राऊत टेलिफोन ऑपरेटर आहे का?; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवरून शिवसेना आमदाराचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:59 PM2023-07-12T12:59:23+5:302023-07-12T13:00:06+5:30
फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात. मुख्यमंत्री कार्यालयातून या महाराष्ट्रातील अनेक कारागृहात गुन्हेगारांशी संपर्क साधला जातो असा आरोप राऊतांनी केला होता.
मुंबई – संजय राऊत आता नवनवीन आरोप शोधतायेत. वर्षावरून कैद्याला फोन जात असतील हा ऑपरेटर आहे का? राऊतांना बोलायचे आहे त्यामागची पार्श्वभूमी समजून घ्या.संजय राऊत हा जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे. दिशाभूल करण्याचे आरोप करतात. राऊतांची सुरक्षा कमी झाल्याने नैराश्य आलंय अशा शब्दात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर घणाघात केला.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, गुन्हेगाराला संपर्क साधायचा असेल तर कुठून साधतात याची अक्कल नाही का? सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याने आलेल्या सरकारची दाऊदची तुलना करतायेत. आरोप करताय तर पुरावे दाखवा. काही नसते पण बेछूट आरोप करायचे हे ठरवले तर त्याला नाईलाज आहे असं त्यांनी सांगितले.
सरकार प्रगतीच्या दिशेने धावतंय
जुनिअरच्या हाताखाली सिनिअर काम करतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला त्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का? त्यांच्या हाताखाली अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी काम केले. आदित्य ठाकरेंपेक्षा आम्ही कितीतरी सिनिअर आहोत तरी त्याला साहेब म्हणावे लागते. हा फरक कळाला नाही. सरकार दिल्लीतून चालते, अमेरिकेतून चालते. राऊतांच्या आरोपाला किंमत नाही. सरकार वेगाने चालतंय. अडीच वर्ष सरकार दबक्यात होते. त्यात किडे पडले होते. ते साफ करून आता सरकार प्रगतीच्या दिशेने धावतंय असं त्यांनी म्हटलं.
मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य टाळलं
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे मुख्यमंत्र्यांना माहिती. मलादेखील उत्सुकता आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने सरकार थांबत नाही. कुणाला कोणते खाते द्यायचे त्यावर बोलणार कसं? जे माहिती नाही त्यावर भाष्य करणे योग्य नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्र बसून चर्चा करतील आणि त्यावर बोलतील. वर्षावर बैठक झाली असेल तर तोडगा काढण्यासाठीच झालेली असेल असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.
संजय राऊतांनी काय केला होता आरोप?
फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात. मुख्यमंत्री कार्यालयातून या महाराष्ट्रातील अनेक कारागृहात गुन्हेगारांशी संपर्क साधला जातो काही लोकांना जामीन देऊन निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच याचे मी तुम्हाला पुरावे देईन. यांची माणसं तुरुंगात आरोपींना जाऊन भेटत आहेत संपर्क केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली निराशा महाराष्ट्रासारख्या राज्यावर काढू नये. तुमच्या हातात यंत्रणा आहे म्हणून तुम्ही ठरवले आहात तर आमने सामने या. हा महाराष्ट्राला कलंकित करण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगावे असा आरोप संजय राऊतांनी केला.