बोंडू काजूच्या खाली असतो की वर? शेतीतले काय कळतेवरून शेलार आणि थोरातांमध्ये 'जुंपली'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 03:34 PM2023-07-18T15:34:40+5:302023-07-18T15:36:52+5:30
पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, राज्यातील शेती प्रश्नावर बाळासाहेब थोरांनी म्हणणे मांडले. मुंडे साहेब तुम्ही शेवटपर्यंत मंत्री रहा, आमचे काही म्हणणे नाही, असे थोरात म्हणाले.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार होते. परंतू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील, कोकणातील मंत्री शेती प्रश्न काय जाणून घेणार, अशा शब्दांत थोरात यांनी नाराजी व्यक्त केली.
यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तुमचे प्रश्न ऐकण्याची जबाबदारी आमच्यावर दिली आहे. मंत्री उपस्थित आहेत. तुम्ही आंब्याविषयी सांगू शकता काय? बोंडू काजूच्या खाली असतो की वर? हे सांगू शकता का, असा सवाल करत सभागृहात प्रश्न मांडण्याची विनंती केली. तसेच स्वत: कृषीमंत्री इथे आहेत, असे मुंडेंकडे हात दाखवून सांगितले.
यावर थोरात यांनी शेलार यांना टोला लगावला. शेलार जर आज मंत्री असते तर त्यांनी असा हलगर्जीपणा केला नसता. ते खुप सिन्सिअर आहेत, म्हणून त्यांना मंत्री केले जात नाही हा आमचा आक्षेप आहे, असे थोरात म्हणाले. याचवेळी थोरातांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील टोला लगावला. वर्षभरात कृषीमंत्री बदलला, आता धनंजय मुंडेंकडे आहे. युतीच्या काळात पाच वर्षांत चार मंत्री पाहिलेले. कृषीखात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण युतीचा कसा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंडे साहेब तुम्ही शेवटपर्यंत मंत्री रहा, आमचे काही म्हणणे नाही, असे थोरात म्हणाले.