"शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?", राऊतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:35 PM2024-09-12T12:35:02+5:302024-09-12T12:39:27+5:30
Sanjay Raut on PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावर विरोधकांकडून टीका होत असून, संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sanjay Raut, PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली आणि दर्शन घेतले. याचा व्हिडीओही पंतप्रधानांनी पोस्ट केला. पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गेल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी भेटीबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होताहेत. पंतप्रधान किती जणांच्या घरी गणेशोत्सवासाठी गेले, ही काय माहिती माझ्याकडे नाही. पण, काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आले. दोघे आरती करताहेत. त्या दोघांचा संवाद हा पाहण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळाले."
आम्हाला न्याय का मिळत नाही? संजय राऊतांचा सवाल
"सरन्यायाधीश आणि पंतप्रधान, खरे म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का? त्याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटनातज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. आमच्या सारख्यांच्या मनात प्रश्न आला, पंतप्रधानांशी इतकी जवळीक असलेले न्यायाधीश, कुणीही असतील, ते महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतोय, त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? तारखांवर तारखा का पडताहेत? अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहेत", असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले.
खासदार संजय राऊत याच मुद्द्यावर बोलताना म्हणाले, "सरन्यायाधीश चंद्रचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना, तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवले जाते. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जाते. हे सरकार घटनाबाह्य आहे, असे स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले. तरीही निर्णय आणि निकाल होत नाही. ते निवृत्तीला आलेत. काल त्यांच्या घरी पंतप्रधान पोहोचले."
#WATCH | PM Narendra Modi attended the Ganesh Puja celebrations at the residence of Chief Justice of India DY Chandrachud, in Delhi. pic.twitter.com/VqHsuobqh6
— ANI (@ANI) September 11, 2024
लोकांच्या मनातील शंका घट्ट झाल्या -संजय राऊत
"याच्यामागे काही वेगळे घडतेय का? हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का? या लोकांच्या मनातील शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या", असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.