पादचाऱ्यांनी डाव्या बाजूनेच चालावे असा काही नियम आहे का? पहा राज्याचे परिवहन आयुक्त काय म्हणतात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 07:48 AM2024-02-27T07:48:56+5:302024-02-27T07:49:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दुचाकी गाड्यांचे वाढते अपघात व विनाहेल्मेट चालकांचे मृत्यूचे चिंताजनक प्रमाण पाहून राज्याच्या परिवहन विभागाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दुचाकी गाड्यांचे वाढते अपघात व विनाहेल्मेट चालकांचे मृत्यूचे चिंताजनक प्रमाण पाहून राज्याच्या परिवहन विभागाने एक अभिनव मोहीम सुरू केली आहे. मोठी कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांशी संपर्क साधून आपापल्या कर्मचारी, अधिकारी यांना हेल्मेटसक्ती करा त्याशिवाय कंपनीच्या आवारात प्रवेश देऊ नका, असा आग्रह धरला जात आहे.
कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट कंपनीच्या आवारात प्रवेश करूच देऊ नका, असा आग्रह धरला जात आहे. तरीही असा प्रकार सुरू राहिला तर आस्थापनांच्या प्रमुखांना एका दिवसासाठी ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे, असे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 'लोकमत'ला सांगितले.
गतवर्षी डिसेंबर अखेरपर्यंत झालेल्या अपघातांमधील ९९ टक्के वाहनचालक हे विनाहेल्मेट असल्याचे आढळले. हेल्मेट असते तर त्यातील किमान ८० टक्के लोक वाचू शकले असते, असे सांगून ते म्हणाले की, अधिकाधिक अपघात सायंकाळी ५ ते रात्री १० च्या दरम्यान होतात.
पादचाऱ्यांनी डाव्या बाजूनेच चालावे असा नियम नाही !
एकूण अपघातांपैकी १८ टक्के अपघात पादचाऱ्यांशी संबंधित आहेत. अनेक शहरांमध्ये पदपथ धड नाहीत. त्यामुळे लोक रस्त्यावरून चालतात आणि अपघाताला निमंत्रण मिळते. वाहने डाव्या बाजूने चालविली जातात म्हणून पादचाऱ्यांनीही डाव्या बाजूनेच चालावे असा काही नियम नाही. पदपथ नसेल तर लोकांनी उजव्या बाजूने चालले पाहिजे. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसेल.