भाजपचा पाठिंबा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे का..?

By अतुल कुलकर्णी | Published: January 15, 2023 11:25 AM2023-01-15T11:25:53+5:302023-01-15T11:25:53+5:30

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई प्रिय नाना पटोले, नमस्कार. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यात राजकीय आदळआपट सुरू आहे. सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांना भाजपकडून पाठिंबा दिला जाईल, अशा बातम्या सुरू झाल्या आणि काँग्रेसने सत्यजीतला थेट आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले. जणू काही अशा निवडणुकीत भाजपचा पहिल्यांदाच पाठिंबा घेतला जात आहे. याआधी किती तरी निवडणुका झाल्या. ज्यात विरोधी पक्षाचा पाठिंबा घेतला गेला. सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार होणार होत्या, तेव्हा शरद पवार मातोश्रीवर गेले. बाळासाहेबांनी दिलदार मनाने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. भाजपने अमल महाडिक यांची उमेदवारी बंटी पाटील यांच्यासाठी मागे घेतली. काँग्रेसने धुळ्यामधून अंबरीश पटेल यांच्यासाठी माघार घेतली. रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात आणि आपण स्वत: देवेंद्र फडणवीस यांच्या घरी कशासाठी गेला होतात..?  प्रज्ञा सातव यांची निवडणूक भाजपने माघार घेतल्याने बिनविरोध झाली. ...

Is this the first time to support BJP..? | भाजपचा पाठिंबा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे का..?

भाजपचा पाठिंबा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे का..?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय नाना पटोले,

नमस्कार.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यात राजकीय आदळआपट सुरू आहे. सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांना भाजपकडून पाठिंबा दिला जाईल, अशा बातम्या सुरू झाल्या आणि काँग्रेसने सत्यजीतला थेट आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले. जणू काही अशा निवडणुकीत भाजपचा पहिल्यांदाच पाठिंबा घेतला जात आहे. याआधी किती तरी निवडणुका झाल्या. ज्यात विरोधी पक्षाचा पाठिंबा घेतला गेला. सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार होणार होत्या, तेव्हा शरद पवार मातोश्रीवर गेले. बाळासाहेबांनी दिलदार मनाने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. भाजपने अमल महाडिक यांची उमेदवारी बंटी पाटील यांच्यासाठी मागे घेतली. काँग्रेसने धुळ्यामधून अंबरीश पटेल यांच्यासाठी माघार घेतली. रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात आणि आपण स्वत: देवेंद्र फडणवीस यांच्या घरी कशासाठी गेला होतात..?  प्रज्ञा सातव यांची निवडणूक भाजपने माघार घेतल्याने बिनविरोध झाली. विश्वजीत कदम पहिल्यांदा जेव्हा निवडून आले, तेव्हा ती निवडणूक भाजपने बिनविरोध होऊ दिली. दुसऱ्यावेळी भाजपने ती जागा शिवसेनेला सोडून विश्वजीत यांचा मार्ग मोकळा केला. विलासराव देशमुख यांनी बंडखोरी करून १९९८ ला विधान परिषदेसाठी अर्ज भरला, तेव्हा ते मातोश्रीवर शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी गेले होते. त्यांचा पराभव झाला. मात्र, पुढे दीडच वर्षांनी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अशी असंख्य उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. मग नाना, आजच एवढा गदारोळ कशासाठी..?

सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरातांचे भाचे असतील, त्यांना राजकीय वारसा असेल, पण ते तरुण नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांच्यासारखे असंख्य तरुण आहेत, ज्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची इच्छा आहे. त्यांचा नंबर लागणार तरी कधी..? सत्यजीत यांनी जे मिळवलं, ते संघर्ष करून मिळवलं. तरुणांना काँग्रेससोबत जोडण्याचे काम जेवढे सत्यजीत यांनी केलं तेवढं तुमच्या पक्षात अन्य कोणत्या नेत्यांनी केले का, अशी चार नावे तुम्ही सांगू शकाल का..? महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना, आदित्य ठाकरे मंत्री व्हायला तयार नव्हते. त्यावेळी आदित्य यांनी मंत्री झाले पाहिजे, हा आग्रह सत्यजीत यांनी धरला होता. राहुल गांधी यांनी मंत्रिपद न स्वीकारून केलेली चूक त्यांना पुढे किती अडचणीची ठरली, हेही त्यांनीच समजावून सांगितले होते. त्यातून आदित्य मंत्री झाले. हे खरे की खोटे...?

आपल्या पक्षात युवक काँग्रेस नावाची संघटना आहे, तिचं नेमकं काम काय आहे...? संघटनेत काम करणाऱ्या तरुणांना आपण संधी देणार आहोत की नाही...? युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी कायम सतरंज्याच उचलायच्या का, नेत्यांच्या मागे गाड्यांमध्ये फिरणं हेच युवक काँग्रेसचं काम आहे का, या प्रश्नांची उत्तरं द्यायची तरी कोणी...? सत्यजीत यांनी जे केलं, ते चूक की बरोबर, हे तरुणांमध्ये जाऊन विचारा. तुम्हाला उत्तर मिळेल. यावेळी अमरावतीची जागा काँग्रेसने सोडून द्यावी आणि नाशिकची जागा घ्यावी, असं ठरलं असताना विधान परिषदेच्या निवडणुकीवरून जेवढा गोंधळ घातला गेला तो कोणामुळे? महाविकास आघाडी एकदिलाने या निवडणुका लढत आहे, असा संदेश देण्याची संधी कोणी घालवली...?

डॉ. सुधीर तांबे यांना कोरा एबी फॉर्म दिला होता, असं आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बोलत आहेत. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी साडेबारा वाजता दिल्लीतून सुधीर तांबे यांचं नाव कोणी घोषित केलं? त्यांचं नाव लिहिलेला एबी फॉर्म दुपारी दीड वाजता कोणी आणून दिला...? पक्षाचे प्रभारी 

एच. के. पाटील यांनी सत्यजीत यांनीच उभं राहिलं पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. मात्र, त्यांच्याऐवजी डॉ. तांबे यांना उमेदवारी कोणाच्या सांगण्यावरून दिली गेली...? हे प्रश्न आता संशोधनाचा आणि पोलिसी भाषेत ‘इन्व्हेस्टिगेशन’चा विषय ठरले आहेत.

आपल्या पक्षातील सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची नावे घेतली आणि त्यांचं सरासरी वय काढलं, तर ते ६० ते ६५ च्या घरात आहेत. तरुणांनी पक्षात यायचं की नाही,  सत्यजीत तांबे यांना अपक्ष उभे राहण्याची वेळ का आली, या प्रश्नांची उत्तरं कोण देईल...? या सगळ्या घडामोडीत कोण जिंकणार, यापेक्षा सत्यजीत जिंकले, तर कोणाचा पराभव होणार...? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. अशा प्रश्नांना राजकारणात कधी उत्तरं मिळत नाहीत, हेच खरं. ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या राजकीय खेळी केल्या, त्या सगळ्यांना शुभेच्छा..! - आपला, बाबूराव

Web Title: Is this the first time to support BJP..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.