उद्धव ठाकरे नवाज शरीफ आहेत का?, मुंब्रा महाराष्ट्रात आहे; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 04:21 PM2023-11-11T16:21:08+5:302023-11-11T16:21:47+5:30
पोलीस शाखा पाडताना कुठे होते? आज सकाळपासून पोलीस रस्त्यावर उतरले, आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवतायेत, जमावबंदीचा आदेश दिलाय, मग शाखा पाडताना ही यंत्रणा कुठे होती? असा सवाल राऊतांनी विचारला.
मुंबई – उद्धव ठाकरे नवाज शरीफ आहेत का? ते उद्धव ठाकरे आहेत. मुंब्रा महाराष्ट्रात आहे, ठाण्यात आहे. ज्यांच्याकडे या राज्याची सूत्रे आहेत, भलेही घटनाबाह्य असले तरी खुर्चीची जबाबदारी आहे. आमची एक शाखा बुलडोझर लावून तोडताना गृहमंत्री, मुख्यमंत्री काय करत होते? ही वेळ त्यांनी आणली आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडवून लोकांची दिवाळी खराब करायची नाही. परंतु जर त्यांनी आमच्यावर काही लादले तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, हा महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांच्या भावनेचा आणि अस्मितेचा विषय आहे. आम्ही जातोय आणि त्यांच्या छाताडावर पाय रोवून उभेही राहू. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ते जातायेत, आम्ही त्यांच्यासोबत सदैव उभे राहू. शिवसेना एकच आहे ती ठाकरेंची, एक शाखा बुलडोझर लावून पाडली जाते, पोलीस बघ्याची भूमिका घेतात. ठाण्यातील शाखा जबरदस्तीने ताब्यात घेतल्या जातात, मुंब्रा इथं शाखा पाडली जाते. आम्ही काय गप्प बसू? तुम्ही अडवा, तुमच्या हातात सत्ता आहे, खोक्यांची मस्ती आहे असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत पोलीस शाखा पाडताना कुठे होते? आज सकाळपासून पोलीस रस्त्यावर उतरले, आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवतायेत, जमावबंदीचा आदेश दिलाय, मग शाखा पाडताना ही यंत्रणा कुठे होती? उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी जे बॅनर्स लागले होते, ते रात्री फाडले गेले. पोलीस काय करत होते? पोलिसांनी मिंदेपणाची भूमिका घेऊ नये. पोलिसांनी तटस्थ असायला पाहिजे. ३१ डिसेंबरनंतर या पोलिसांचे मालक राहतील की जातील हे त्यांनी बघायला हवं असंही संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि २०२४ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावर असतील याची मला खात्री आहे. संघर्ष झाला तर त्याचा फटका एका बाजूला बसेल, जनता आणि शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. दिवाळीच्या सणाचा विचार आम्ही करतोय. पण याची जाणीव आणि काळजी सरकारमध्ये असणाऱ्यांनी घ्यायला हवी. आम्ही तिथे गेलो आणि आलो, तिथे सभा घेत नाही असंही राऊतांनी सांगितले आहे.