इस्लामपुरातील घरकुल योजनेच्या यादीत गर्भश्रीमंतही!

By admin | Published: March 11, 2015 11:43 PM2015-03-11T23:43:43+5:302015-03-12T00:07:03+5:30

अजब कारभार : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या फेरसर्वेक्षणाची मागणी, ६0 टक्के लाभार्थ्यांबाबत संशय

Ishaulapurera crib scheme list of pregnant women! | इस्लामपुरातील घरकुल योजनेच्या यादीत गर्भश्रीमंतही!

इस्लामपुरातील घरकुल योजनेच्या यादीत गर्भश्रीमंतही!

Next

अशोक पाटील -इस्लामपूर  शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्र्थींच्या यादीत चक्क गर्भश्रीमंतांचा समावेश आहे. या यादीतील सुमारे ६0 टक्के कुटुंबांकडे स्वत:ची घरे आहेत. त्यांच्यातील काहींचा सावकारीचा व्यवसाय आहे, तर काहीजण चारचाकीतून फिरतात! त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण व्हावे, अशी मागणी होत आहे.
१९९६ मध्ये ज्या कुटुंबांचा दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश झाला आहे, त्यांनाच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी महादेवनगर परिसरात १0८ घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे, परंतु या घरकुलांमध्ये १0 टक्के लोकही वास्तव्यास नाहीत. या घरकुलांना अद्यापही वीज व पाण्याची सुविधा नाही. त्यांचा वापर आता अवैध व्यवसायांसाठी सुरू झाला आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही. या घरकुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे मत व्यक्त करत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला होता.
स्मशानभूमीनजीक बांधलेल्या ३९५ घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ६0 टक्के कुटुंबीय इतरत्र स्वत:च्या घरात रहात असून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. ज्यांना घरकुले देण्यात आली आहेत, त्यांच्याकडून घरकुलासाठी लागणारी रक्कम भरून घेण्यात आली आहे. मात्र यातील काही कुटुंबे पुणे, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. शहरातील महत्त्वाच्या खासगी भूखंडांवर झोपड्या बांधून राहणाऱ्या कुटुंबांनाही यातील घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. पालिकेचे पदाधिकारी हे भूखंड घशात घालण्याच्या कामाला लागले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण करून, खरोखरच ज्यांना गरज आहे, त्यांनाच या घरकुलांचे वाटप करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


विमानाने प्रवास!
१९९६ मध्ये दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांतील एकास घर मिळाले. ते सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. घरकुलाचे पैसे भरण्यासाठी त्यांनी मुंबई ते पुणे विमानाने प्रवास केल्याची चर्चा आहे.

१९९६ मध्ये दारिद्र्य रेषेखाली समाविष्ट असलेल्या कुटुंबांच्या आजच्या परिस्थितीचे फेरसर्वेक्षण करावे. जेणेकरून खऱ्या लाभार्थीला त्याचा लाभ होईल. जे घरकुलासाठी पात्र नसतील, त्यांना घरकुल मिळाले, तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यांविरोधात शासनाकडे तक्रार करु.
- विक्रम पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

Web Title: Ishaulapurera crib scheme list of pregnant women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.