एटीएसच्या कारवाईमुळे मुंबईत आयएसआयचे हस्तक भूमिगत
By admin | Published: May 9, 2017 01:47 AM2017-05-09T01:47:41+5:302017-05-09T01:47:41+5:30
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने आयएसआयचे जाळे उद्ध्वस्त केल्याने, मुंबईतील आयएसआयचे हस्तक भूमिगत झाल्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने आयएसआयचे जाळे उद्ध्वस्त केल्याने, मुंबईतील आयएसआयचे हस्तक भूमिगत झाल्याची शक्यता एटीएसकडून वर्तविण्यात येत आहे. मुंबईतील तीन ते चार तरुणांचा यामध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, यूपी एटीएस त्यांच्या मागावर आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या जावेद इक्बाल नेवीवाला (३१), अल्ताफ कुरेशी (३३) यांना सोमवारी ट्रान्झिट रिमांडद्वारे लखनऊला रवाना करण्यात आले आहे. तेथे यूपी एटीएसने त्यांचा ताबा घेतला आहे.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईत फैजाबादमधून आयएसआयचा हेर आफताब अली याच्यासह जावेद आणि कुरेशीला मुंबईतून अटक केली. जावेद हा आफताबला पैसे पुरवित होता. मुंबईतील आणखी तीन ते चार तरुण जावेदच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. हे तरुण आयएसआयसाठी काम करत असल्याचा संशय यूपी एटीएसला आहे. त्यानुसार, यूपी एटीएस महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने संशयितांना शोध घेत आहे. मात्र, कारवाईच्या भीतीने ते भूमिगत झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सोमवारी जावेद आणि अल्ताफला यूपी
एटीएसने ट्रांन्झिट रिमांडद्वारे न्यायालयात हजर करून ताबा घेतला. मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीसाठी दोघांनाही पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती यूपी एटीएसने दिली आहे. यूपी एटीएसच्या ताब्यात असलेल्या आफताबची कसून चौकशी सुरू आहे. त्यातून अनेक महत्त्वाची माहिती एटीएसच्या हाती लागली असल्याचेही यूपी एटीएसने सांगितले आहे. मंगळवापासून यूपी एटीएस तिघांचीही एकत्रित चौकशी करणार आहे.