‘आयएसआय’च्या हस्तकाला मुंबईत अटक

By Admin | Published: May 5, 2017 04:43 AM2017-05-05T04:43:09+5:302017-05-05T04:43:09+5:30

आयएसआय’च्या दोन एजंटवरील कारवाईपाठोपाठ भारतातील हवाला रॅकेटच्या हस्तकाला राज्य दहशतवाद विरोधी पथक(एटीएस)ने

'ISI man arrested in Mumbai | ‘आयएसआय’च्या हस्तकाला मुंबईत अटक

‘आयएसआय’च्या हस्तकाला मुंबईत अटक

googlenewsNext

मुंबई : ‘आयएसआय’च्या दोन एजंटवरील कारवाईपाठोपाठ भारतातील हवाला रॅकेटच्या हस्तकाला राज्य दहशतवाद विरोधी पथक(एटीएस)ने गुरुवारी मुंबईत अटक केली. जावेद इक्बाल नेवीवाला (३३) असे त्याचे नाव असून, गेल्या आठ वर्षांपासून ‘आयएसआय’साठी तो हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
मूळचा राजकोट येथील धोराजीचा रहिवासी असलेला जावेद हा पदवीधर आहे. आग्रीपाडा येथील युसुफ मंजिलमध्ये तो स्वत:च्या मालकीच्या घरात कुटुंबासोबत राहतो. २००९मध्ये तो मुंबईत आला. तेव्हापासून तो मुंबईत हवाला रॅकेट चालवत आहे. त्यानंतर २०१३मध्ये तो वर्षभरासाठी गुजरातला गेला. २०१४मध्ये पुन्हा मुंबईत आला.
यापूर्वी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने फैजाबादमधून आफताब अली आणि मुंबईतून अल्ताफ कुरेशीला अटक केली होती. पायधुनीतून अल्ताफला बेड्या ठोकून त्याच्याकडून ७१ लाख ५७ हजार ८०० रुपये आणि मोबाइल जप्त करण्यात आला होता. अल्ताफ मुंबईत भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्याच चौकशीतून जावेदचे नाव समोर आले. ‘दवा के लिये... गरीब को पैसे चाहिये...’ अशा संवादाची माहिती मिळताच पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे तपासात समोर आले.
जावेदला गुरुवारी अटक करण्यात आली. जावेद हा भारतातील हवाला रॅकेटचा सूत्रधार असल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसकडून करण्यात येत आहे. जावेदकडे पाकिस्तानने पैसे जमा करण्याचे काम सोपवले होते. त्याच्या सांगण्यावरूनच अल्ताफ कुरेशीने खात्यात पैसे जमा केले होते. जावेदनेच ‘आयएसआय’च्या सांगण्यावरून फैजाबाद येथे असलेल्या आफताबच्या खात्यात पैसे जमा केल्याचे पुरावेही एटीएसच्या हाती लागले आहेत. ही मंडळी भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. जावेदकडून दोन मोबाइल, कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याच्या कॉल डिटेल्समध्ये तो सतत ‘आयएसआय’च्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणात जावेदचे आणखी दोन ते तीन नातेवाईक आणि कुटुंबीयांचा सहभाग समोर येत आहे.
जावेद कोणाच्या संपर्कात होता. यामध्ये आणखी किती जण आहेत? त्याने आतापर्यंत किती पैसे कुठे व कधी व कोणाच्या खात्यात जमा केले? याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. अल्ताफ आणि जावेदला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी ८ मे रोजी दोघांनाही ट्रान्झिट रिमांडद्वारे लखनऊला नेण्यात येणार आहे.

आफताबने घेतले ‘आयएसआय’चे प्रशिक्षण

आफताब अलीने पाकिस्तानात जाऊन ‘आयएसआय’चे प्रशिक्षण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याजवळ असलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, काही नकाशे, अनेक चिठ्ठ्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.


‘आयएसआय’चे धोराजी कनेक्शन: गुजरातच्या राजकोट येथील धोराजी शहरात जवळपास २३ हजार लोकवस्ती आहे. जावेद आणि अल्ताफ येथीलच रहिवासी आहेत. त्याच्यासारखेच आणखीन बरेच आयएसआय हस्तक या ठिकाणी राहत असल्याचा संशय आहे.
दोन महिन्यांपासून नजर: गेल्या दोन महिन्यांपासून उत्तरप्रदेश एटीएस फैजाबादच्या आफताबवर नजर ठेवून होते. संशय खरा ठरताच त्यांनी ही कारवाई केली.

जावेदकडून यासीन भटकळलाही पैसे

इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ यालाही जावेदने पैसे पुरवल्याची माहितीही तपासात समोर येत आहे. जावेदचे भटकळसोबत काही कनेक्शन होते का? होते तर कसे? याचा शोध सुरू आहे. त्याने किती पैसे कशासाठी दिले? याचाही शोध एटीएस घेत आहेत.

Web Title: 'ISI man arrested in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.