पैशासाठी इसिसची बॉॅलिवूडवर नजर?
By admin | Published: May 16, 2016 02:13 AM2016-05-16T02:13:48+5:302016-05-16T02:13:48+5:30
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काही दिवसांपूर्वीच इसिसच्या एका कटाचा पर्दाफाश केला
डिप्पी वांकाणी,
मुंबई- राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काही दिवसांपूर्वीच इसिसच्या एका कटाचा पर्दाफाश केला होता. दरम्यान, पकडण्यात आलेल्या काही संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार यातीलच एका गटाचा उपप्रमुख असलेल्या रिझवान अहमद (२०) याने या चौकशीत सांगितले की, प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल आणि मोहन भागवत यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता. त्यानंतर कर्नाटकातील वीरप्पन लपत होता त्या जंगलात पळून जाण्याचे आदेश होते. तथापि, भारताविरुद्धच्या कारवायांसाठी बॉलीवूडमधून पैसा जमा करण्याचे आदेशही म्होरक्यांकडून या टोळीतील सदस्यांना देण्यात
येत होते, अशी माहिती समोर
येत आहे.
इसिसचे जे प्रमुख २० सदस्य होते त्यातील रिझवान हा दोन नंबरचा प्रमुख होता. यातील बहुतांश जणांना देशाच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. रिझवान हा मुंब्रा येथील मुदब्बीर शेख यास रिपोर्टिंग करीत होता. मुदब्बीर हा ‘आमीर’ (प्रमुख) म्हणूनही ओळखला जातो. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधून सुरू झालेला आपला प्रवास रिझवानने कथन केला आहे. बारावीत ६७ टक्के गुण घेणारा रिझवान नंतर या दुनियेत सक्रिय झाला. हवालामार्गे सुरुवातीला पैसा मिळाला. नंतर त्याला असे सांगण्यात आले की, बॉलीवूडमधील प्रतिष्ठितांना लक्ष्य करून पैसा जमा करावा. स्वत:ला आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी आणि कामाच्या विस्तारासाठी चोऱ्या करण्याचेही त्याला सांगण्यात
आले होते.
चौकशीदरम्यान रिझवानने सांगितले की, फेसबुकच्या माध्यमातून तो सफी अम्मार ऊर्फ युसूफच्या संपर्कात आला होता. हाच युसूफ ‘अन्सार- ए- तौहीद’चा प्रमुख आहे. त्यांचे इसिसला समर्थन आहे. युसूफने रिझवानला सांगितले होते की, अल कायदा आणि तालिबान यांनी त्यांना निधी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर जगात खिलाफतची स्थापना करण्यासाठी इसिसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
>मुदब्बीर शेख : मतभेद असूनही प्रमुखपदी
मुदब्बीर शेख याची इसिसचा देशातील आमीर (प्रमुख) म्हणून घोषणा झाली होती, तर अन्य चार जणांत डेप्युटी कमांडर, संपर्कप्रमुख, आॅपरेशनप्रमुख आणि अर्थप्रमुख, अशी जबाबदारी लखनौ येथील बैठकीत देण्यात आली. मुदब्बीरला आमीर (प्रमुख) घोषित करण्याबाबत मतभेद होते; पण इसिसचा प्रमुख अबू-बक्र-अल-बगदादी याने हा निर्णय घेतला होता.
गोव्यातील अपार्टमेंट सोडू नका, असे युसूफने रिझवानला सांगितले होेते; पण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी मालवणी तरुण घर सोडून पळाले ही बातमी टीव्हीवर पाहताच रिझवान घर सोडून पळाला.
हत्यारांची खरेदी आणि जंगलात लपण्यासाठी छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांची मदत घेण्याचे ठरले होते; पण पोलिसांच्या भीतीमुळे ही योजना बदलली आणि कर्नाटकाच्या जंगलात आश्रय घेण्याचे ठरले. ज्या भागात वीरप्पन राहत होता.
रिझवान हा पनवेलमध्ये एका मित्रासह दोन महिने थांबला होता. कुशीनगरचा त्याचा हा मित्र येथे एका बांधकाम कंपनीत काम करीत होता. रिझवानने त्याला सांगितले होते की, आपण मुंबईत कपड्याचा व्यवसाय सुरू करू इच्छितो. रिझवानने त्याच्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागांत त्याने टोळीच्या सदस्यांसोबत बैठका घेतल्या होत्या.