तरुणांना गळास लावण्यासाठी ‘इसिस’चा व्हिडिओ
By admin | Published: January 29, 2016 01:38 AM2016-01-29T01:38:27+5:302016-01-29T01:38:27+5:30
इंटरनेटवरून इस्लामी कट्टरवादाचा प्रचार करून इस्लामिक स्टेटसाठी लढण्यास उद्युक्त करण्याच्या आरोपावरून गेल्या आठवड्यात देशभरातून अटक केलेल्या भारतीय तरुणांना परदेशातील
- डिप्पी वांकाणी, मुंबई
इंटरनेटवरून इस्लामी कट्टरवादाचा प्रचार करून इस्लामिक स्टेटसाठी लढण्यास उद्युक्त करण्याच्या आरोपावरून गेल्या आठवड्यात देशभरातून अटक केलेल्या भारतीय तरुणांना परदेशातील अतिरेक्यांच्या म्होरक्याने ‘कंदहार से दिल्ली’ अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ पाठविला होता, अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. ‘अल इसाबा मीडिया’ने हा व्हिडिओ तयार केला आहे. अन्सार उल तौकिफची ही मीडिया विंग आहे. ही इसिसची एकनिष्ठ संघटना आहे.
या व्हिडिओत काही तरुण दिसत आहेत. चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे. रायफल्सचे प्रशिक्षण घेताना हे तरुण दिसत आहेत आणि इसिसचा झेंडा दाखविण्यात आला आहे. या झेंड्याने भारताचा नकाशा व्यापल्याचेही यात दाखविण्यात आले आहे. हा मूळ व्हिडिओ एटीएसने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे.
पहिला व्हिडिओ हा अन्सार उल तौहिद या टायटलने आहे. यात चेहरा झाकलेला इसिसचा अबू बक्र अल बगदादी हा दिसत आहे. अरेबी भाषेतून तो आपली विचारधारा मांडत आहे. हा व्हिडिओ शफी अम्मार उर्फ युसूफ याने २०१३ मध्ये पाठविलेला आहे. हाच शफी अटक केलेल्या या १६ जणांच्या संपर्कात होता. हा व्हिडिओ आणि इतर सायबर पुरावे आम्ही तपासणीसाठी पाठविले आहेत, असे एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस सद्या विविध राज्यांच्या पोलिस ठाण्यांच्या संपर्कात आहेत. या राज्यातून हरवलेल्या व्यक्तींची माहितीही घेण्यात येत आहे. कारण, उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या रिझवान उर्फ निवाजुद्दिनने काही तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, अटक करण्यात आलेल्या या तरुणांनी मागील काही आठवड्यात सोशल मीडियाचा वापर केला नव्हता असे आता स्पष्ट होत आहे. पोलिसांच्या रडारवर येण्याच्या भीतीपोटीच या तरुणांनी ही सावधानता बाळगली होती.
तो तरुण गेला कतारला?
खेडचा एक तरुण कतारला गेला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तो पाटण्यात नोकरी करत होता. तथापि, तो या नोकरीवर समाधानी नव्हता. तर हा तरुण थेट इसिसमध्ये सहभागी झाला असल्याची शक्यता या तरुणाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
विक्रोळीचा इसम इसिसमध्ये?
मागील वर्षी नोव्हेंबरपासून गायब असलेला विक्रोळीचा एक इसम इसिसमध्ये सामिल झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. चोरीच्या एका प्रकरणात तो वाँटेड होता.
हवालामार्गे पैसा
कारवायांसाठी लागणारा पैसा हवालामार्गे पाठविण्यात आला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य पूर्व भागातील भारतीय लोक कुटुंबीयांना पैसे पाठवितात अशीच पद्धत कदाचित वापरण्यात आली असावी.