इसिसधार्जिण्या शिक्षकाला अटक
By admin | Published: August 9, 2016 04:31 AM2016-08-09T04:31:19+5:302016-08-09T04:31:19+5:30
इसिसेशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका शिक्षकाला परभणी-हिंगोली बसमध्ये जवळाबाजार बसस्थानकात सोमवारी अटक केली.
हिंगोली : इसिसेशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका शिक्षकाला परभणी-हिंगोली बसमध्ये जवळाबाजार बसस्थानकात सोमवारी अटक केली.
रईसोद्दिन सिद्दीकी (३८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, तो गेल्या तीन वर्षांपासून हिंगोली येथील जि.प.च्या शाळेतील (उर्दू माध्यम) इंग्रजीचा शिक्षक आहे. येथील आजम कॉलनी भागात तो सलीम आॅटोवाला यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन राहात होता. त्याचे वरचेवर परभणीला जाणे-येणे सुरू असायचे. त्याचा भाऊ औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय अधिकारी असून, दोन बहिणी या शिक्षिका आहेत़ त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले़
दहशतवादी कारवायांसाठी तो इतरांना प्रशिक्षित करीत असे, या संशयावरून त्याला ताब्यात घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आजम कॉलनीतील त्याच्या खोलीची एटीएसने झाडाझडती घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
इकबालच्या घरीच बनवला बॉम्ब
परभणी येथून रविवारी अटक केलेला इसिस समर्थक शेख इकबाल कबीर अहमद (२४) याच्या घरी बॉम्ब तयार करण्यात आला होता, असे एटीएसच्या चौकशीत उघड झाले आहे. एवढेच नव्हे, औरंगाबादेतील मोठ्या पदावरील तीन जण त्यांचे ‘टार्गेट’ होते, असे तपासात समजले आहे.