कोरेगाव-भीमातील दंगलग्रस्तावर ‘इस्लामी हिंद’ घालणार फुंकर !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 07:52 PM2018-01-10T19:52:14+5:302018-01-10T20:12:53+5:30
कोरेगाव-भीमा दंगलीनंतर समाजात निर्माण झालेल्या सामाजिक तेढीवर फुंकर घालण्यासाठी जमाअत-ए- इस्लामी हिंद या संघटनेने पुढाकार घेतला आहे.
मुंबई : कोरेगाव-भीमा दंगलीनंतर समाजात निर्माण झालेल्या सामाजिक तेढीवर फुंकर घालण्यासाठी जमाअत-ए- इस्लामी हिंद या संघटनेने पुढाकार घेतला आहे. राज्यात पूर्ववत एकात्मता व बंधुतेचे वातावरण कायम राहून जातीय व धार्मिक द्वेष दूर व्हावा, यासाठी येत्या शुक्रवार (दि. १२) राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे.
पुण्यातील कोरेगाव-भीमा या ठिकाणासह राज्यभरातील ६०० ठिकाणी विविध माध्यमातून सामाजिक समता व बंधुतेचा प्रसार करण्यात येणार आहे. २१ जानेवारीपर्यंत चालणा-या या मोहिमेमध्ये ५० लाख नागरिकांशी संवाद साधण्यात येईल, असा दावा संघटनेचे सचिव अस्लम गाझी व डॉ. सलीम खान यांनी दिली. या मोहिमेमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफसह अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहकार्याने शाळा, महाविद्यालये, बस स्थानके आदी ठिकाणी धार्मिक, जातीय एकात्मतापर व्याख्यान, रॅली, भीती पत्रकांचे वाटप केले जाईल. व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल माध्यमाचाही वापर केला जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट बनविण्यात आल्याचे शकीर अहमद व मुजीब आदील, शेख हुमायून यांनी सांगितले.
इस्लाम हा शांती, सामाजिक विकास व बंधुतेची शिकवण देणारा धर्म असून, त्याचे पूर्णपणे आचरण केल्यास समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरेला आळा बसेल, त्याच्या प्रसारासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद कार्यरत असते. दरवर्षी पंधरवडाभर विशेष मोहीम राबविली जात आहे. या वर्षी कोपरगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीमुळे सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या तीन वर्षांपासून जातीय शक्ती व संघटनांच्या हालचाली वाढत असून धार्मिक व सामाजिक एकात्मता आणि विकास रोडावत चालला असताना या दंगलीमुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जाणार आहे. विविध मान्यवर, तज्ज्ञ सहभागी होती. कोपरगाव येथे जाऊन दलित व मराठा समाजासमवेत चर्चा करून पूर्ववत एकोपा कायम राखण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे गाझी यांनी सांगितले.