इस्रोच्या मोहिमेत मोलाचा वाटा
By Admin | Published: June 8, 2017 01:08 AM2017-06-08T01:08:09+5:302017-06-08T01:08:09+5:30
भारताने आजवर अनेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर : भारताने आजवर अनेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. सोमवारी (दि. ५) भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या माध्यमातून जीएसएलव्ही एमके-थ्री डी-१ प्रक्षेपकाच्या साह्याने जीसॅट १९ या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यात आजवरच्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहापैकी हा उपग्रह सर्वाधिक वजनाचा होता. त्या उपग्रहाचे काही भाग वालचंदनगर कंपनीने बनवले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने प्रक्षेपण केलेले व इस्रोने आजपर्यंत सोडलेल्या उपग्रहांपैकी या उपग्रहाचे वजन ३ हजार १३६ किलो असून यापुढे भारत या यशस्वी उड्डाणामुळे ४ हजार किलो वजनाचा उपग्रह सोडू शकणार आहे. सोमवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अवकाश केंद्रातून सायंकाळी साडेपाच वाजता हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या उपग्रहामुळे इंटरनेट सेवा वेगवान होण्यास मदत होणार आहे. या यशस्वी मोहिमेत मोठी प्रगती होणार आहे. याचा फायदा भविष्यात अशाच यानातून संशोधक मनुष्यही अवकाशात सोडणे भारताला सोपे जाणार आहे. या यानाला लागणाऱ्या भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. या यशस्वी उड्डाणासाठी वालचंदनगर कंपनीने एस २०० स्ट्रप आॅन मोटर केस हे महत्त्वाचे भाग बनवले आहेत. या यानाच्या दोन्ही बाजूला ते भाग बसवलेले असून यात हेड अँड सेग्मेंट मिडल सेग्मेंट व झोनल सेग्मेंट बसवण्यात आलेले आहे. यानाला दिशा देण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे.
ही कंपनी १९०८ पासून कार्यरत असून ४५ वर्षांपासून भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे. यापूर्वीच्या यशस्वी करण्यात आलेल्या मंगळायन मोहिमेत याच कंपनीच्या माध्यमातून यानाच्या मुख्य भागाची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे भारतीय संशोधनामुळे फेब्रुवारी महिन्यात जगातील सर्वांत मोठा उपग्रह सोडण्यात आला, त्यात १०४ उपग्रह सोडण्यात भारताने विश्वविक्रम केला त्या १०४ उपग्रहांत या वालचंदनगर कंपनीची मोलाची कामगिरी होती. त्यामुळे भारतीय उपग्रहात मोलाची कामगिरी करीत गेल्यामुळे कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लाई यांनी दिली.