अवैध कीटकनाशकांची विक्री करणा-यांवर मोक्कासारखे गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 12:17 PM2017-10-22T12:17:07+5:302017-10-22T12:19:21+5:30

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीच्या विषबाधेने २१ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला, तर चारशेवर बाधित झाले.

Issue of cases related to illegal pesticides, black money orders, Chief Minister's orders | अवैध कीटकनाशकांची विक्री करणा-यांवर मोक्कासारखे गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

अवैध कीटकनाशकांची विक्री करणा-यांवर मोक्कासारखे गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next

यवतमाळ - परवानगी नसताना कीटकनाशकांची विक्री करणा-या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे (मोक्का) गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. 

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीच्या विषबाधेने २१ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला, तर चारशेवर बाधित झाले. या शेतक-यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी यवतमाळात आले होते. त्यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. अवैध कीटकनाशकांची विक्री करणा-या कृषी केंद्र आणि कंपन्यांचा शोध घेवून त्यांच्यावर मोक्कासारखे गुन्हे दाखल करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. 

वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य विभाग आणि कृषी विभागातील रिक्त पदांचा त्यांनी आढावा घेतला. रिक्त पदे तत्काळ भरण्याचे आदेश दिले. येथे नियुक्त होणा-या डॉक्टरांकडून बाँड लिहून घेण्यास सांगितले. कराराचा भंग करीत कुणी नोकरी सोडली तर त्यांना पुन्हा कधीही शासकीय सेवेत घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच कृषी आणि आरोग्य विभागाची यंत्रणा सतत अलर्ट ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

या बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

मेडिकलच्या ‘त्या’ डॉक्टरांवर कारवाई
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणा-या आणि शहरात खासगी प्रॅक्टीस करणा-या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना दिले. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात शासनाचा विशेष भत्ता घेऊनही ११ डॉक्टर खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे पुढे आले. या डॉक्टरांबाबत मुख्यमंत्र्यांनी कडक निर्देश देत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

Web Title: Issue of cases related to illegal pesticides, black money orders, Chief Minister's orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.