दुष्काळाच्या मुद्यावर शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर!

By admin | Published: March 14, 2016 01:25 AM2016-03-14T01:25:30+5:302016-03-14T01:25:30+5:30

शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक; बुधवारी करणार आंदोलन.

On the issue of drought, Shivsena government is home! | दुष्काळाच्या मुद्यावर शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर!

दुष्काळाच्या मुद्यावर शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर!

Next

अकोला: तीन वर्षांपासून सातत्याने नापिकीचा सामना करीत असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने केवळ ५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली. त्यामुळे शेतकर्‍यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या मुद्यावर आता राज्यात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकारला घरचा आहेर देत आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोला जिल्हा शिवसेनेने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची आढावा बैठक रविवार दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत शासनाकडून विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गत आठवड्यात शिवसेना पदाधिकार्‍यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली होती, असे सांगून जिल्हा प्रमुखांनी या मुद्यावर कोणताही समाधानकारक निर्णय अद्याप शासनाकडून घेण्यात आला नसल्याने शिवसेनेला शेतकर्‍यांच्या मुद्यावर आक्रमक व्हावे लागेल, असा इशारा दिला. शिवसेनेतर्फे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत धरणे दिले जाणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले. या आंदोलनात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह सर्व कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी अडचणीत असतील तेव्हा त्यांच्या मदतीला शिवसैनिक धावून जाईल. त्यासाठी आम्ही सत्तेत आहो किंवा नाही याचा विचार करणार नाही. आंदोलन करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच शिवसैनिकांचा जन्म झाला असल्याचे पिंजरकर म्हणाले. तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार रामाभाऊ कराळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपजिल्हा प्रमुख सेवकार ताथोड, बंडू ढोरे, उपमहापौर विनोद मापारी यांनी आढावा बैठकीत विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा यांनी तर संचालन योगेश गीते यांनी केले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, ज्ञानदेवराव परनाटे, तरुण बगेरे, बादलसिंग सुकेडे, हरिभाऊ भालतिलक, धनंजय गावंडे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, संजय शेळके, संतोष अनासने, अतुल पवनीकर, योगेश अग्रवाल, गजानन चौधरी, शंकरराव ताथोड, गजानन चव्हाण आदींसह बहुसंख्य आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: On the issue of drought, Shivsena government is home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.