पाणी वाटपावरून राष्ट्रवादीतच वाद
By admin | Published: December 16, 2015 03:04 AM2015-12-16T03:04:21+5:302015-12-16T03:04:21+5:30
मराठवाड्याच्या पाणी वाटपावरून मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांवरून चाललेली मूळ चर्चा काही
नागपूर : मराठवाड्याच्या पाणी वाटपावरून मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांवरून चाललेली मूळ चर्चा काही वेळ बाजूला राहिली व मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्राच्या आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर उपसभापतींच्या मध्यस्थीनंतर सदस्य शांत झाले.
राज्यातील दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधान परिषदेत मंगळवारी सकाळी चर्चेला सुरुवात झाली. शेकापचे जयंत पाटील हे आपले मुद्दे मांडत असताना त्यांनी मराठवाड्याच्या पाणी वाटपाचा मुद्दा काढला. राज्यात समन्यायी पाणी वाटप झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत जाधव आक्रमक झाले. दुष्काळ काय मराठवाड्यातच आहे का? उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या आहे. आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला का द्यायचे.
मराठवाड्यातील पाणी सिंचनासाठी वापरण्यात येते, असे ते म्हणाले. यावर राष्ट्रवादीचेच अमरसिंह पंडित व सतीश चव्हाण यांनी विरोध केला. मराठवाड्यात प्यायला पाणी नाही, तेथे सिंचनासाठी काय वापरणार असे म्हणत दोघेही आक्रमक झाले. (प्रतिनिधी)