"लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत"; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 07:53 AM2024-08-08T07:53:15+5:302024-08-08T07:54:06+5:30
फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे मुद्दे विधानसभा निवडणुकीत चालणार नाहीत. विरोधकांनी भाजप आणि मित्र पक्षांबद्दल जे फेक नरेटिव्ह चालविले, त्यातील फोलपणा आता लोकांना समजला आहे. त्यामुळे विधानसभेला विजय आपलाच होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मुंबई आणि कोकणातील आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला.
फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले.
मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले, तर संविधान बदलले जाईल, तसेच आरक्षण संपुष्टात येईल, असा अपप्रचार महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला. त्याचा मोठा फटका मुंबईत बसला, असे मत आमदारांनी व्यक्त केले. मुस्लीम समाजाने मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मते दिली. संविधान बदलाच्या अफवांमुळे दलित मतदारदेखील त्यांच्याभोवतीच एकवटला. मात्र, लोकसभा निवडणुकीत असलेले हे मुद्दे आता विधानसभा निवडणुकीत नसतील, असे मत आमदारांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी या भूमिकेला दुजोरा दिला, पण त्याच वेळी महाविकास आघाडीकडून आणखी काही फेक नरेटिव्ह पसरविले जातील; त्यांचा यशस्वीपणे मुकाबला करा, असे ते म्हणाले.
१९९८च्या निवडणुकीचा दाखला
लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले, याचा अर्थ विधानसभेलाही येईल, असे मानण्याचे काहीही कारण नाही. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला महाराष्ट्रात १४ जागा मिळाल्या होत्या. आपल्या विरोधकांना ३४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर एकच वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या युतीला सव्वाशे पेक्षा अधिक जगा मिळाल्या होत्या. पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या जवळपास आपण पोहोचलो होतो, याकडे फडणवीस यांनी आमदारांचे लक्ष वेधले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी मंत्री गणेश नाईक आदी उपस्थित होते.