शिक्षणव्रतींचे विधायक काम पुढे आणणे अभिनंदनीय
By Admin | Published: February 21, 2016 03:31 AM2016-02-21T03:31:28+5:302016-02-21T03:31:28+5:30
अनेकदा नकारात्मक बातम्यांचेच अधिक कौतुक होते; मात्र अनेक जण निरपेक्षपणे चांगले, विधायक कार्य करतात, त्यांना जगासमोर आणण्याचे काम कोणीही करीत नाही. ‘लोकमत एज्युकेशन आॅफ आयकॉन्स’
पुणे : अनेकदा नकारात्मक बातम्यांचेच अधिक कौतुक होते; मात्र अनेक जण निरपेक्षपणे चांगले, विधायक कार्य करतात, त्यांना जगासमोर आणण्याचे काम कोणीही करीत नाही. ‘लोकमत एज्युकेशन आॅफ आयकॉन्स’ या कॉफीटेबल बुकमधून विधायक कार्य करणाऱ्या शिक्षणव्रतींना समाजासमोर आणले, ही अभिनंदनीय गोष्ट असल्याचे कौतुकोद्गार शालेय, उच्च व तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढले.
तावडे म्हणाले, ‘‘शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. गेल्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव शिक्षण विषयावर आला होता. ९५ टक्के सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे
हे चित्र पाहून महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात
नक्कीच मोठी आणि चांगली प्रगती करू शकतो, असे वाटते. अनेक विद्यापीठांमध्ये संशोधनाचा पाया दुर्बल आहे. उच्च शिक्षणात अनेक गोष्टींचे संशोधन होण्याची गरज आहे. आजकाल संशोधन केवळ पगारवाढ, एचओडी, प्रोफेसर होण्यासाठी केले जाते; मात्र त्यापलीकडे जाऊन ज्ञान मिळविण्यासाठी संशोधन होत नाही. संशोधन त्या पातळीवर होण्याची खूप गरज आहे. संशोधनात कॉपी-पेस्ट पद्धत वाढली आहे; त्यामुळे ती रोखण्यासाठी एका वेबपोर्टलवर पीएच.डी.चे सगळे थिसीस टाकण्याचा मानस आहे. विद्यापीठाचे कुलगुरू चांगले काम करताहेत; पण दर्जा वाढवायचा असेल, तर संशोधनावर भर देण्याची गरज आहे.
घोका-ओका पद्धतीत बदल व्हावा
लहान बदलच खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शिक्षणव्यवस्थेत एका प्रश्नाचे एकच उत्तर का? एका प्रश्नाची दहा उत्तरे
का नाहीत? घोकंपट्टी सुरू केल्याने असे घडत आहे. घोका आणि ओका अशी ही पद्धत. अशा पद्धतीला बदलण्याची गरज आहे.