अनुदानित शाळांत ‘विज्ञान’ला प्रवेश मिळविणे कठीण

By admin | Published: June 13, 2016 01:43 AM2016-06-13T01:43:11+5:302016-06-13T01:43:11+5:30

विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असल्याने ९० टक्केपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानित शाळांमधील विज्ञान शाखेत प्रवेश मिळविणे कठीण झाले आहे़

It is difficult to get access to science in aided schools | अनुदानित शाळांत ‘विज्ञान’ला प्रवेश मिळविणे कठीण

अनुदानित शाळांत ‘विज्ञान’ला प्रवेश मिळविणे कठीण

Next

 

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात १० वीचा निकाल चांगला लागला आहे. त्यातच ९० टक्के गुण मिळविणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असल्याने ९० टक्केपेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानित शाळांमधील विज्ञान शाखेत प्रवेश मिळविणे कठीण झाले आहे़ संस्थाचालकांनादेखील विज्ञान शाखेत सर्वांना प्रवेश कसा देता येईल, यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ विज्ञान शाखेत प्रवेश मिळविणे हे विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे़
यावर्षी माध्यमिक शालान्त परीक्षेचे निकाल चांगले लागले आहेत. जुन्नर तालुक्यात ९१ माध्यमिक शाळा आहेत़ या शाळांमधून ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे़ या सर्व विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असल्याने या वेळेस ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदानित शाळा असलेल्या विज्ञान शाखेत प्रवेश सहज मिळेल़ परंतु, ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळणे मुश्कील आहे़ या विद्यार्थ्यांचादेखील कल विज्ञान शाखेकडे आहे, मात्र त्यांना अनुदानितऐवजी विनाअनुदानित वर्गात प्रवेश घ्यावा लागणार आहे़
पूर्वी ७५ ते ८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील अनुदानित वर्गात सहजरीत्या प्रवेश मिळत असे़
परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून दहावीचा निकाल चांगला लागत असल्याने ९० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच अनुदानित शाळेचा लाभ मिळत आहे़
दहावी निकालानंतर पॉलिटेक्निककडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा फटका पॉलिटेक्निक असलेल्या महाविद्यालयांना बसला आहे.
विज्ञान शाखा असलेल्या शाळांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत़ मात्र, विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा व तोदेखील अनुदानित वर्गात मिळावा, यासाठी पालकवर्ग प्रयत्नशील आहे़ परंतु, शाळेने मेरीटनुसार प्रवेशभरती सुरू ठेवल्यास ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या विनाअनुदानित वर्गात प्रवेश घ्यावा लागणार आहे़
>विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनदेखील अनुदानित वर्गात प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे़ चांगले गुण मिळवूनदेखील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना परिश्रम घ्यावे लागणार असल्याने तणावयुक्त वातावरणात पालकवर्ग आहे़
>मयूरी कसबे हिचे प्रतिकूलतेत यश
नारायणगाव : रंगकाम करणाऱ्या मजुराच्या मुलीने चिंचोली येथील मधुकर काशिद विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. मयूरी नंदकुमार कसबे हिने ८७.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. नंदकुमार कसबे हे मजुरीने रंगकाम करतात, तर आई अनिता कसबे या शेतात मजुरी करतात.घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना परिस्थितीवर मात करीत मयूरी शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे मयूरी ही शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी आईसोबत शेतात मोलमजुरीच्या कामासाठी जात असे. गरिबीमुळे दहावीच्या परीक्षेसाठी तिला क्लासेस लावणे शक्य नव्हते. क्लास नसताना तसेच कोणाचेही मार्गदर्शन नसताना आहे त्या परिस्थितीत तिने अभ्यासात भरपूर परिश्रम घेतले. आपल्या मुलीने विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविल्याचे समजल्याने तिच्या वडिलांना आपले आनंदाश्रू लपविता आले नाही. मयूरीचे आजोबा दत्तात्रय कसबे यांनी नातीच्या यशाबद्दल पेढे वाटून आनंद व्यक्त केला. मयूरीने यश मिळविल्याबद्दल केरबा फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ आल्हाट यांनी तिचे व माता-पिता यांचा सत्कार व अभिनंदन केले.

Web Title: It is difficult to get access to science in aided schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.