जोगवा मागून ‘तो’ करतोय इंजिनिअरिंग

By admin | Published: March 27, 2017 02:44 AM2017-03-27T02:44:54+5:302017-03-27T02:44:54+5:30

सिया पाटील हा तृतीयपंथी जोगवा मागून आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे

It is 'engineering' by doing Jogwa | जोगवा मागून ‘तो’ करतोय इंजिनिअरिंग

जोगवा मागून ‘तो’ करतोय इंजिनिअरिंग

Next

शिरूर : सिया पाटील हा तृतीयपंथी जोगवा मागून आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. कुटुंबाने अद्याप त्याच्या या रूपास स्वीकारले नसल्याने तीन वर्षांपूर्वी त्याने घर सोडले.
जोगवा मागून मिळणाऱ्या पैशातून, तसेच साथीदारांच्या मदतीतून त्याने इंजिनिअरिंगची दोन वर्षे पूर्ण केली असून, आता तो तृतीय वर्षास आहे.
समाजाने आम्हाला आहे तसे स्वीकारले पाहिजे, अशी अपेक्षा त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सिया पाटील हे आताचे नाव, मूळ नाव दुसरे. पुरुष म्हणून जन्माला आला म्हणून घरातील मंडळींनी आनंद व्यक्त केला. पाटोदा येथे त्यास शाळेत दाखल करण्यात आले. आठवीत त्याच्या शरीरातील बदलाविषयी त्याला समजले. आपण काहीतरी वेगळे आहोत, याची जाणीव झाली. कुटुंबातील लोकांना सांगितले.
मात्र, यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. कसेबसे त्याने तसेच शिक्षण सुरू ठेवले. दहावीला ६८ टक्के गुण मिळवले. पाटोद्यातच अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीतही ७० टक्के गुण मिळवले. शिक्षण सुरू होते; मात्र मानसिक संघर्ष सुरूच होता. कुटुंबच स्वीकारत नाही. मग समाज कसा स्वीकारणार, हा प्रश्न त्याला अस्वस्थ करीत होता. त्याच मन:स्थितीत घर सोडण्याचा निर्णय घेतला.
संदीप गिरी या जोगत्याशी सियाचा संपर्क आला. त्यास सारे ‘मम्मी’ म्हणून संबोधतात. मम्मीने सहारा दिला. सियाला इंजिनिअरिंग करायचे होते. मम्मीशी सल्लामसलत करून सियाने कुरुंद येथे इंजिनिअरिंग महाविद्यालयात २०१४मध्ये प्रवेश घेतला. तत्पूर्वी सियाने सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. पँट-शर्टमध्ये वावरणारा मुलगा साडी नेसू लागला. लांब केस, कपाळाला कुंकू.
घरात लाडात जीवन जगणाऱ्या सियाने जोगवा मागण्यास सुरुवात केली. सहकाऱ्यांसमवेत जोगवा मागण्याबरोबरच देवाचे कार्यक्रमही करू लागला. यातून मिळणाऱ्या पैशातून कॉलेजचे शुल्क भरले, अभ्यासाची पुस्तके घेतली. अर्थात, त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मोलाची मदत केली. यातूनच त्याने इंजिनिअरिंगची दोन वर्षे पूर्ण केली. याच महिन्यात त्याची तिसऱ्या वर्षाची परीक्षा आहे. (वार्ताहर)

कॉलेजात पुरुष, घरी तृतीयपंथी
सिया तीन वर्षे झाली महाविद्यालयात जात आहे. महाविद्यालयात जाताना पँट-शर्ट घालून पुरुष बनून जावे लागते. घरी आल्यावर साडी नेसून जोगवा मागण्याची तयारी करावी लागते. कॉलेजात पुरुष, घरी तृतीयपंथी अशीच भूमिका त्याला दररोज बजवावी लागते.

Web Title: It is 'engineering' by doing Jogwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.