हिंदू असल्याचे वाईट वाटते

By admin | Published: January 12, 2017 03:06 AM2017-01-12T03:06:03+5:302017-01-12T03:06:03+5:30

माझं काही चुकत आहे, तर मी माफी मागते, ही परिस्थिती आता राहिलेलीच नाही. त्या माणसालाही काही मत असू शकते

It feels bad to be Hindu | हिंदू असल्याचे वाईट वाटते

हिंदू असल्याचे वाईट वाटते

Next

नम्रता फडणीस / पुणे
लेखिका, स्त्रीवादी चळवळीच्या पुरस्कर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, अशा विविधांगी भूमिकेतून विद्या बाळ यांनी समाजातील विषयांना वाचा फोडली. परिवर्तनवादी विचारांची कास धरली, त्यांची लढाई ही पुरुषविरोधी नव्हती, तर स्त्रियांना हव्या असलेल्या समान हक्कांची होती. वयाच्या ८१व्या वर्षात उद्या (दि. १२) त्या पदार्पण करीत आहेत. मात्र, आजही स्त्रियांच्या प्रश्नांशी तितक्याच ताकदीने भिडण्याची त्यांच्यातील धग कायम आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

माझं काही चुकत आहे, तर मी माफी मागते, ही परिस्थिती आता राहिलेलीच नाही. त्या माणसालाही काही मत असू शकते, ते ऐकून न घेता सरळ भांडण, मारामारी, खून या गोष्टींपर्यंत मजल जाते. यातून काय मिळणार आहे, हेच कळत नाही. शांतपणे दुसऱ्याचे ऐकून घेणे, त्याला विचारांनी प्रतिवाद करणे या गोष्टी व्हायला पाहिजेत, पण ते होताना दिसत नाही. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कुठे चालला आहे? विचार हे धर्माच्या पलीकडचेच असले पाहिजेत. शाहू, फुले-आंबेडकर यांचे नाव घेऊन स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि जगण्या-बोलण्यात फरक दाखवायचा. सत्ताधाऱ्यांना मुस्लिमांचे प्रमाण वाढल्यासारखे वाटते, मात्र मुस्लिमांचे प्रमाण हे १५ ते १८ टक्के इतकेच आहे. न्यूनगंड कसला आहे? जो भारतात राहतो तो भारतीय आहे. धर्मनिरपेक्षतेची खूण त्यांच्या मनातच नाही. हिंदुत्वाचा अहंकार करण्याची गरजच काय? धर्म हा आपल्या घरात पाळावा. मात्र धर्म आणि देश एकाच जागी ठेवून गोंधळ घातला आहे. त्यामुळे मला हिंदू असल्याचे वाईट वाटते, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी सांगितले.
* महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हटले जाते? मात्र सत्ताधाऱ्यांच्या लादल्या जाणाऱ्या विशिष्ट गोष्टींमुळे पुन्हा धार्मिक उन्मादाकडे प्रवास सुरू झाला आहे, असे वाटते का?
- जुन्या काळात जे आदर्श होते असे वाटते तेच पुन्हा लादण्याचा प्रयत्न होतो आहे हे नक्की. १८४८ मध्ये महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली आणि जगाची कवाडे महिलांना खुली करून दिली. मात्र, आपण काळाच्या मागे चाललो आहोत, मुलींनी असेच कपडे घालायचे नाहीत, इतकीच मुले जन्माला घाला. धार्मिक कार्यक्रमांना पुरोगामी राज्याचा मुख्यमंत्री जातो यातच सगळे आले.
* ‘स्त्री’ मासिक ते ‘मिळून साऱ्या जणी’ या मासिकांचा प्रवास कसा होता? पत्रकारितेत बदल झाले आहेत असे वाटते का?
- स्त्री मासिकात १९६४ ते १९८६ अशी २२ वर्षे सहायक संपादक, मुख्य संपादक म्हणून काम केले. स्त्री मासिकामुळे जीवनदृष्टी बदलली. विचारांच्या कक्षा रुंदावल्या आणि मिळून साऱ्या जणीचा पाया तयार होत गेला. तिथून राजीनामा दिल्यानंतर १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्या जणी’ हे मासिक सुरू केले. ४० वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता केली. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर झपाट्याने बदल झाले असल्याचे नक्कीच जाणवते. त्या काळात लेखक आणि संपादकाचे नाते खूप मोकळेपणाचे होते. ते वातावरण आज तुलनेने कमी झाल्यासारखे वाटते. पत्रकारितेत नवीन तंत्रज्ञानामुळे दोघांमधील अंतर वाढत गेले आहे.
* पत्रकारितेत अधिक काळ घालविल्यानंतर काय भावना मनात येते?
- पत्रकारितेशी बांधिलकी राखली तर विचारांचे वाहक होऊ शकतो, प्रबोधनाची एक लाट निर्माण होऊ शकते. स्त्री मासिक वाचणारी जुने लोक भेटतात आणि म्हणतात तुमच्या कामाने आणि मासिकाने आम्हाला आधार दिला, तेव्हा याच्यासारखा दुसरा पुरस्कार नाही, अशी भावना होते, हे समाधानच खूप मोठे आहे.

Web Title: It feels bad to be Hindu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.