‘विहिंप’ची पाटी वाहनावर लावणे बेकायदेशीर

By Admin | Published: July 8, 2017 03:51 AM2017-07-08T03:51:09+5:302017-07-08T03:51:09+5:30

मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही

It is illegal to put VHP in the vehicle | ‘विहिंप’ची पाटी वाहनावर लावणे बेकायदेशीर

‘विहिंप’ची पाटी वाहनावर लावणे बेकायदेशीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी बेकायदेशीर असून, त्यांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये केलेली कृतीदेखील कायदेशीर नसल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.
शिर्के यांच्याविरुद्ध बेकायदेशीर पाटी लावल्याबद्दल छावणी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सरकारने सांगितले. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मालेगाव येथे काही व्यक्ती गार्इंची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून गोवंश संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालक व क्लीनर यांना मारहाण केली होती. त्यानंतर, गोवंश संरक्षण समितीचे सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के आदींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
संगमेश्वर भागात नंतर मच्छिंद्र शिर्के यांच्यावर हल्ला झाला. त्यावरून छावणी पोलीस ठाण्यात तन्वीर खान खलीलखान यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
प्रमुख संशयित तन्वीर खान याचा मालेगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने १२ जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता़
मात्र, त्याच वेळी न्यायालयाने शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी कायदेशीर आहे किंवा कसे, याबाबत सरकारने शहानिशा करावी. पाटी लावणे बेकायदेशीर असेल, तर पोलिसांनी त्यावर काय कार्यवाही केली, याचा खुलासा करावा, अशी सूचना सरकारला केली होती.
त्यानुसार, सरकारने हे स्पष्टीकरण न्यायालयात केले़

बेकायदेशीर पाटीबाबत गुन्हा दाखल

अलीकडेच न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे तन्वीर खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम सुनावणी झाली. सरकारतर्फे वाहनावर ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी शिर्के लावू शकत नाहीत. त्यांचे कृत्य बेकायदेशीर असून, शिर्के हे प्राणी कल्याण अधिकारी नाहीत, शासनाच्या प्राणी कल्याण समितीचे ते सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांनी गोवंश रक्षक म्हणवून घेणेही चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. शिर्के यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान् वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, असे सरकारने न्यायालयात सांगितले.

बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई ?
मालेगाव येथील घटनेत न्यायालयाने खासगी वाहनांवर लावण्यात आलेल्या पाटीबद्दल सरकारला जाब विचारल्याने, पोलिसांना यापुढे बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई करावी लागू शकते.

Web Title: It is illegal to put VHP in the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.