स्त्रियांनी लिहिते होणे आवश्यक
By admin | Published: March 7, 2017 01:08 AM2017-03-07T01:08:43+5:302017-03-07T01:08:43+5:30
स्त्रियांचे अनुभव, त्यांचे सुख-दु:ख साहित्यात येणे आवश्यक आहे.
पिंपरी : स्त्रियांचे अनुभव, त्यांचे सुख-दु:ख साहित्यात येणे आवश्यक आहे. जेणेकरून ते साहित्य महिलांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे स्त्रियांनी लिहिते होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया वाड यांनी केले.
स्वानंद महिला संस्था आणि आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला विभाग यांच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंग मंदिरात बारावे अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन सोमवारी झाले. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. रुचिरा सुराणा यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष मंगल संचेती, मुंबई दूरदर्शन केंद्राचे महासंचालक मुकेश शर्मा, ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे, संमेलनाच्या मुख्य संयोजिका सुरेखा कटारिया, स्वानंद संस्थेच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षा वर्षा टाटिया, पारस मोदी, डॉ. नलिनी जोशी, कांतीलाल बोथरा, मोहनलाल संचेती, प्रमिला सांकला, रंजना लोढा, आदेश खिंवसरा आदी उपस्थित होते.
डॉ. वाड म्हणाल्या, ‘‘स्त्री साहित्याकडे हेटाळणीने पाहण्याचे दिवस गेले आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या मनाचे विरेचन साहित्यातून केले आहे. तसेच आपल्या साहित्याची समीक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावी. कारण जो समीक्षेकडे सकारात्मकतेने पाहतो, तोच खरा साहित्यिक होय. पालकांनी मुलींना स्वातंत्र्य द्यावे, जेणेकरुन त्या मुक्त वावरतील आणि त्यातून आपल्याला उत्तम साहित्य मिळेल.’’
जैन कॉन्फरन्स पंचम झोन प्रदेशाध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी प्रास्ताविक केले.
मराठी साहित्याचे वाचन जैन महिला खूप करतात. मात्र त्या लिखाण करत नाहीत. त्यांची विचारक्षमता जास्त असते. मात्र त्या बोलत नाहीत. या महिलांनी लिहिले पाहिजे. आपले विचार व्यक्त केले पाहिजेत, असे आवाहन रुचिरा सुराणा यांनी केले.
मंगल संचेती यांनी स्वागत केले. या वेळी जैन विद्या प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस दिवंगत शंकरलाल मुथा यांच्या जीवनचरित्रावर आधारित ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सकाळी आठला संत तुकारामनगर येथील संत तुकाराममहाराज मंदिरापासून आचार्य अत्रे रंगमंदिरापर्यंत ग्रंथदिंडीही काढण्यात आली.
>परिसंवाद : करिअर जन्मठेप नव्हे, स्वावलंबन
घर सांभाळून नोकरी करणे हे महिलांचे कौशल्यच आहे. आजची स्त्री या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहे. करिअर हे महिलांसाठी जन्मठेप नसून, स्वावलंबन आहे, असा सूर संमेलनातील सहाव्या सत्रात झालेल्या परिसंवादात उमटला. अध्यक्षस्थानी आॅल इंडिया जैन कॉन्फरन्सचे महामंत्री अशोककुमार पगारिया होते. या परिसंवादात प्रतिभा जगताप, हणमंत पाटील, दीपक मुनोत, सुरेखा कटारिया यांनी भाग घेतला. डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचलन केले.
> महिला एकत्र येण्यासह त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आणि महिलांविषयक साहित्याची दिशा निश्चित करण्यासाठी संमेलनाचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. स्त्रियांना स्वावलंबी बनविणे आणि स्त्री चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी स्त्रियांचे साहित्य हे प्रमुख माध्यम आहे.
- मंगला अभय संचेती, स्वागताध्यक्षा, अ.भा. स्त्री साहित्य-कला संमेलन