5 ऑगस्टपर्यंत परीक्षांचे निकाल लागणं अशक्य; कुलगुरूंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 02:05 PM2017-08-01T14:05:06+5:302017-08-01T14:07:09+5:30
मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत.
मुंबई, दि. 8- मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत. 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागतील, त्यानंतर निकालाची छपाई होईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळाबद्दल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या दरम्यान युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली होती. या भेटील युवा सेना पदाधिकाऱ्यांना कुलगुरूंनी ही माहिती दिली आहे. तसंच या संपूर्ण वादावर बुधवारी (2 ऑगस्ट) कुलगुरू माध्यमांशी बोलण्याचीही शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळाविरोधात मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कलिनामध्ये आंदोलन केलं. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडें यांच्याविरोधात युवा सेनेच्या घोषणा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. परीक्षांचे निकाल लावायला विद्यापीठ आणि तावडे नापास झाले असल्याचं मत यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच विनोद तावडे यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. आंदोलना दरम्यान युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठ कुलगुरूंची भेट घेतली.
विद्यापीठात कायदा विषयाचे पेपर तपासायला प्राध्यापक नसल्याने औरंगाबाद विद्यापीठातून प्राध्यापक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण 25 प्राध्यापक उपलब्ध झाले आहेत. पेपर तपासणीचा हा तिढा सोडविण्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयाशी बोलणार असल्याचं कुलगुरूंनी सांगितल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.