जनतेचे हित हेच सरकार आणि पत्रकारितेचे लक्ष्य

By admin | Published: December 9, 2014 12:57 AM2014-12-09T00:57:07+5:302014-12-09T00:57:07+5:30

एका विचारवंताच्या म्हणण्यानुसार सरकार आणि पत्रकार हे सहयोगी नसून प्रतिस्पर्धी आहेत. पण, तरीही जनतेचे हित साधणे हे दोघांचेही उद्दिष्ट असते. लोकप्रतिनिधींना राज्यकारभार करण्याचा अधिकार आहे,

It is the interest of the public that the Government and the goal of journalism | जनतेचे हित हेच सरकार आणि पत्रकारितेचे लक्ष्य

जनतेचे हित हेच सरकार आणि पत्रकारितेचे लक्ष्य

Next

मा. गो. वैद्य : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
नागपूर : एका विचारवंताच्या म्हणण्यानुसार सरकार आणि पत्रकार हे सहयोगी नसून प्रतिस्पर्धी आहेत. पण, तरीही जनतेचे हित साधणे हे दोघांचेही उद्दिष्ट असते. लोकप्रतिनिधींना राज्यकारभार करण्याचा अधिकार आहे, ही बाब पत्रकारांनी लक्षात घ्यायला हवी. त्याचवेळी, सरकारचा राज्यकारभार कसा चाललाय याबाबत भाष्य करण्याचा अधिकार पत्रकारांचा आहे, हे राज्यकर्त्यांनीही लक्षात घेणे गरजेचे आहे. समाजाचे हित साधणे हेच आपले अंतिम ध्येय आहे, हे दोन्ही घटकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, भाष्यकार व विचारवंत मा.गो. वैद्य यांनी केले.
विधिमंडळाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे ज्येष्ठ संपादक व विचारवंत मा.गो. वैद्य यांचा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळाच्या सभागृहात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा.गो. वैद्य यांच्या पत्नी सुनंदा वैद्य, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री मेघनाद बोधनकर, लक्ष्मणराव शास्त्री, टी.बी. गोल्हर, राजाभाऊ पोफळी, उमेश चौबे, ए.पी. अंधारे, प्रकाश दुबे, जगन वंजारी, प्रदीप मैत्र, बबनराव नाखले यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मा.गो. वैद्य म्हणाले, मी हाडाचा पत्रकार नाही. अपघाताने पत्रकार झालो. वयाच्या ४१ व्या वर्षी आपला व्यवसाय सोडून मी पत्रकारितेत आलो. मी परखडपणे लिहिले परंतु कधी कुणाला शिव्या दिल्या नाहीत. पत्रकाराला शब्दांचे अर्थ माहिती असणे आवश्यक आहे. भूतकाळाचा मागोवा घेत वर्तमानकाळातील परिस्थिती लक्षात घेऊन भविष्याचा वेध घ्यावा, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. यावेळी नागेश केसरी यांनी आपला पेन भेट देऊन वैद्य यांना सातत्याने लिहीत राहण्याची विनंती केली. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख,विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर यांनीही मा.गो. वैद्य यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी आमदार कपील पाटील, आ. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी प्रास्ताविक केले. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी संचालन व आभार मानले. (प्रतिनिधी)
मा.गो. वैद्य यांचे विचार सर्वांसाठी पथदर्शी
ज्येष्ठ संपादक भाष्यकार आणि विचारवंत मा.गो. वैद्य यांनी उत्तम शिक्षक, उत्तम पत्रकार, उत्तम आमदार आणि उत्तम संघटक अशी चौफेर भूमिका निभावून समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे ज्ञान आणि त्यांचे विचार आपणा सर्वांसाठी पथदर्शी आहेत, असे गौरवोदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

Web Title: It is the interest of the public that the Government and the goal of journalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.